हिंगोलीतील गरजूंच्या मदतीला दानशूरांचा आधार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर हिंगोली नगरपालिकेने सुरू केलेल्या मदत केंद्रास अनेकांनी हातभार लावला आहे. या माध्यमातून जमा झालेली मदत गरजूपर्यंत पोचविली जात आहे. तसेच जिल्हाभरात विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते गरजूंना मदत करत आहेत.

हिंगोली : लॉकडाउनच्या काळात अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक संस्था, संघटना, पक्ष पदाधिकारी, मदतीसाठी सरसावले आहेत. हिंगोली नगरपालिकेने सुरू केलेल्या मदत केंद्रासही अनेकांनी हातभार लावला आहे. या माध्यमातून जमा झालेली मदत गरजूपर्यंत पोचविली जात आहे. हिंगोली नगरपालिका मदत केंद्रातर्फे आतापर्यंत ९४७ गरजूंना घरपोच मदत केल्याची माहिती मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिली.

लॉकडाउनमुळे अनेकांच्या रोजगाराच्या प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच परराज्यातील अनेकजण जिल्ह्यात अडकून पडले आहेत. रोजगाराअभावी हातावर पोट असणाऱ्या नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हिंगोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी शहरातील दानशूर व्यक्तींनी गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले होते. 

हेही वाचाVideo ः रोगप्रतिकारशक्‍तीच्या वाढीसाठी या पंचसूत्रीचा अवलंब करा

प्रशासनाच्या अहवानाला प्रतिसाद

त्‍या आवाहनाला प्रतिसाद देत नगरपालिकेने तयार केलेल्या मदत संकलन केंद्रात मदत येण्यास सुरवात झाली. यात धान्य, किराणा साहित्यासह रोख रकमेचा समावेश आहे. पालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या मदतीने किराणा साहित्यासह अन्नधान्याचे किट तयार करून शहरातील गरजूंचा शोध घेत घरपोच किटचे वाटप केले. 

गरजूंना घरपोच साहित्य 

आतापर्यंत शहरातील ९४७ गरजूंना साहित्य घरपोच देण्यात आले आहे. यात घरकाम करणाऱ्या १३४ महिलांचा समावेश आहे. चपल, बूट शिवणारे ३४, तसेच शहरातील ६७ वृत्तपत्र विक्रेते, सात तृतीयपंथी, दिव्यांग, सायकल रिक्षावाले आदींचा समावेश आहे.

१८४ एकल महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

हिंगोली : उगम ग्रामीण विकास संस्था, मकाम पुणे, कोरो इंडिया मुंबई व टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील ३७ गावांतील विधवा, परितक्ता, आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील महिला, ऊसतोड कामगार महिला, दिव्यांग आशा १८४ एकल महिलांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

ऊसतोड कामगारांना मदत

कोरो इंडियाच्या अनुराधा पंडित यांच्या तर्फे मसोड, हातमाली, शिवणी खुर्द, कळमकोंडा खुर्द व उमरा गावामध्ये २६ कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सोपेकाम संस्था मकाम नेटवर्कच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त कुटुंब व ऊसतोड कामगारांच्या ९६ कुटुंबांना एक महिन्याचे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.

सह्याद्री बहुउद्देशीय संस्थेचा पुढाकार

 टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे माजी विद्यार्थी जयाजी पाईकराव यांनी ६५ कुटुंबीयांना, तर उगम संस्थेच्या सचिव छायाताई पडघन यांनी १६ गावांतील ९५ महिलां कुटुंबीयांना मदत केली. तसेच गौतम मोगले यांनी प्रेरणा महिला विकास संस्थेतर्फे सात गावांतील ३२ महिलांना, तर बालाजी नरवाडे यांनी सह्याद्री बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून नऊ गावांतील ३२ महिलांना किराणा साहित्याचे वाटप केले.

मुख्यमंत्री सहायता निधीला तीन हजारांची मदत

कळमनुरी : येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल मतीन शेख यांनी तीन हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांच्याकडे मंगळवारी (ता. २१) दिला आहे.

येथे क्लिक कराहिंगोलीत राजस्‍थानकडे जाणारे २६३ कामगार सीमाबंदीमुळे अडकले

नागनाथ संस्‍थानतर्फे गरजूंना मदत

औंढा नागनाथ : येथील नागनाथ संस्‍थानतर्फे जिल्‍ह्यातील गरजू कुटुंबीयांना अन्नधान्य किटचे वाटप करण्याचे काम सुरू झाले आहे. हिंगोली शहरात मंगळवारी (ता. २१) पाचशे किट घेऊन वाहन आले आहे. या वेळी विश्वस्त गणेश देशमुख, गजानन वाखरकर, डॉ. पुरुषोत्तम देव, देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक शंकर काळे व इतर विश्वस्त होते. 

३८ लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय

औंढा नागनाथ, हिंगोली, कळमनुरी तालुक्यात अशा पद्धतीने किट वाटप केल्या जाणार असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली. दरम्‍यान, मुख्यमंत्री सहायता निधीला २१ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. सहायक धर्मदाय आयुक्त रवींद्र धायतडक यांच्या सुचनेनुसार व आमदार संतोष बांगर, संस्‍थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार पाडुरंग माचेवाड व विश्वस्त सल्लागार मंडळाच्या निर्णयानुसार ३८ लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Philanthropic support to help the needy in Hingoli Hingoli news