लॉकडाउनच्या कात्रीने टेलरिंग व्यवसायाचे तुकडे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

लग्नराईत दिवसभरात एक टेलर दोन ते तीन ड्रेस तयार करतात. हाताखालील कारागीर असणारे टेलर तर चार ते पाच ड्रेस दररोज तयार करतात. एका ड्रेससाठी पाचशे ते सहाशे रुपये मजुरी घेतली जाते. मात्र, लॉकडाउनमुळे या व्यवसायाला घरघर लागली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

हिंगोली : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे टेलरिंग व्यावसायायिक अडचणीत सापडले आहेत. अनेक जणांचा घरसंसार यावरच अवलंबून असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अगोदर रेडीमेड कपड्यांनी डबघाईस आलेला हा व्यवसाय आता पुरता बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.

शहरात गल्‍लोगल्‍ली तसेच बाजारातील मुख्य रस्‍त्‍यावर अनेक जण टेलरिंगचा व्यवसाय करतात. यावर त्यांच्या कुटुंबीयांसह कारागिरांचा उदरनिर्वाह चालतो. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ऐन लग्नसराईत लॉकडाउन, संचारबंदी सुरू झाली. यामुळे टेलरिंगची सर्वच दुकाने बंद झाली आहेत. 

हेही वाचाCovid-19 : हिंगोलीला पुन्हा हादरा, दिवसभरात ५० नवे रुग्ण

शहरात अडीचशे ते तीनशे टेलर

यावर अनेकांचा घरसंसार चालतो. शहरात छोटेमोठे अडीचशे ते तीनशे टेलर आहेत. यासह महिलादेखील टेलरिंगचा व्यवसाय करतात. त्‍यांची संख्याही भरपूर आहेत. लग्नसराईतून या व्यवसायाला चांगला हातभार लागतो. एका टेलरकडे किमान चार ते पाच कारागीर काम करण्यासाठी असतात. 

एका ड्रेससाठी पाचशे मजुरी

लग्नराईत दिवसभरात एक टेलर दोन ते तीन ड्रेस तयार करतात. हाताखालील कारागीर असणारे टेलर तर चार ते पाच ड्रेस दररोज तयार करतात. एका ड्रेससाठी पाचशे ते सहाशे रुपये मजुरी घेतली जाते. त्‍यात कारागिरांना कपड्याच्या नगाप्रमाणे दर ठरविलेला असतो.
एक कारागीर दिवसभरात तीनशे ते साडेतीनशे रुपयांचे काम करीत असल्याचे बाबू टेलर यांनी सांगितले. 

 घर संसारात चांगली मदत 

लेडीज टेलर दिवसभरात चार ते पाच ब्‍लॉऊज तयार करतात. त्‍यातून खर्च जाता अडीचशे ते तीनशे रुपये मिळतात. ब्लाऊज शिवण कामातून घर संसारात चांगली मदत होत असल्याचे संगीता कल्याणकर यांनी सांगितले. ब्लाऊज शिवाय पंजाबी ड्रेस, चुडीदार ड्रेस आदी प्रकारांचे ड्रेसदेखील शिवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. 

येथे क्लिक कराआठशे किलोमीटर धावली अन् रिकामी परतली...

कापड घेऊन येणाऱ्यांची संख्या कमी

मात्र, कापड दुकाने तसेच विविध रंगांच्या रिळ, कॅन्हव्हॉस कापड, गुंड्या, हूक, बटन, लटकन, विविध रंगांचे फॉल मशीन ऑईल आदी साहित्याची दुकानेही बंद आहेत. त्यामुळे टेलरकडे कापड घेऊन येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्‍यामुळे टेलरसह त्याच्या दुकानात काम करणारे कारागीरदेखील अडचणीत आले आहेत.

 

रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला 

लग्नसराईत पाच कारागीर हाताखाली काम करतात. सर्वांना यातून रोजगार मिळतो. मात्र, कोरोनाचे संकट आल्याने टेलरिंगचा व्यवसाय लॉक झाला आहे. अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता सर्वच दुकाने सुरू होत असताना कापड विक्री व टेलरिंगची दुकाने सुरू होण्याची अपेक्षा आहे.
-गणेश टेलर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pieces of tailoring business by lockdown Hingoli news