मोबाईलवरून मागवला पिझ्झा, झाली ९० हजारांची मज्जा

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

कस्टमर सेंटरने पाठविलेल्या लिंकवर त्यांनी नाव, युपीआय आणि पीन विचारून घेतले. थोड्या वेळाने चक्क पुन्हा यांच्या खात्यातून ८८ हजार ५०० रुपये काढून घेऊन आॅनलाईन गंडा घातला.

नांदेड : येथील एका सेवानिवृत कर्मचाऱ्याने ऑनलाईन ऑर्डर करून पिझ्झा मागविला. त्यासाठी त्यांनी पैसेही बॅंक खात्यातून ऑनलाईन पाठवले. परंतु पिझ्झा आला नसल्याने त्यांनी पैसे परत मिळावे म्हणून कस्टमर सेंटरला फोन केला.

कस्टमर सेंटरने पाठविलेल्या लिंकवर त्यांनी नाव, युपीआय आणि पीन विचारून घेतले. थोड्या वेळाने चक्क पुन्हा यांच्या खात्यातून ८८ हजार ५०० रुपये काढून घेऊन ऑनलाईन गंडा घातला. हा प्रकार सहा ते आठ फेब्रुवारीच्या दरम्यान वर्कशॉप येथील एचडीएफसी बँकेत घडला.

पिझ्झा पडला ८८ हजाराला

शहराच्या लोकमित्रनगर परिसरातील बसवेश्‍वरनगरमध्ये राहणारे सेवानिवृत्त कर्मचारी बळीराम परशुराम माने यांनी गुरूवारी (ता. सहा) ऑनलाईन पिझ्झा मागितला. त्यासाठी लागणारे पैसेही त्यांनी ऑनलाईन भरणा केले. मात्र ऑर्डर देऊन व पेसे भरूनही पिझ्झाची डिलिव्हरी झाली नाही. म्हणून त्याने शनिवारी (ता. आठ) दुपारी एकच्या सुमारास त्या ऑनलाईन अॅपच्या कस्टमर केअर सेंटरला जाब विचारला.

यावेळी ग्राहक सेवा केंद्रांनी त्यांना व्यवस्थित विचारपूस करत आपली एक लिंक पाठविली. या लिंकवर त्यांनी श्री. माने यांना आपले नाव, आॅर्डर नंबर, यूपीआय पिन क्रमांक विचारला. विश्‍वासाने श्री. माने यांनी आपली माहिती लगेच त्यांना सांगितली. 

हेही वाचाअत्याचार करणाऱ्या चुलत्यास वीस वर्ष सक्त मजुरी

८८ हजार ५०० चा गंडा 

थोड्या वेळाने त्यांच्या मोबाईलवर एक संदेश आला. तो त्यांनी वाचताच त्यांना पुन्हा चांगलाच हादरा बसला. आलेल्या संदेशात त्यांच्या बॅंक खात्यातून तब्बल ८८ हजार ५०० रुपये आॅनलाईन काढून घेतले. बँक खात्यातून पैसे परस्पर काढून घेतल्याचे समजताच त्यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात जावून घडलेल्या प्रकराची माहिती दिली. यावरून पोलिसांनी यात चौकशी करून अखेर मंगळवारी (ता. ११) रात्री उशिरा अज्ञातांविरुद्ध फसवणुक व माहिती तंत्रज्ञान कायद्या नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे करत आहेत. 

पोलिसांचे आवाहन
नांदेड शहर व जिल्ह्यात आॅनलाईनद्वारे खरेदी करणाऱ्यांचे किंवा एटीएम हॅक करून खात्यातील पैसे परस्पर लंपास करणारी टोळी सक्रीय झाल्याचे वाढत्या घटनांवरून दिसून येते. खातेदाराला बँक कधीच फोनवर कुठलीच वैयक्तीक माहिती विचारत नाही. असे जर फोन आले तर ते फोन नागरिकांनी घेऊ नये. तसेच अनोळखी फोनवर आपली कुठलीच माहिती देऊ नये असे आवाहन केले आहे.
- विजयकुमार मगर, पोलिस अधीक्षक, नांदेड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pizza under the name of online 90 thousand nanded news