वनस्पती कमी करतात घातक वायूची तीव्रता : Video

मधुकर कांबळे
रविवार, 1 डिसेंबर 2019

पिंपळ, वड, अशोक, जांभूळ, आंबा अशी मोठ्या पानांची आणि गुलमोहर, चिंच, निंब अशा लहान व संयुक्‍त पानांची झाडे प्रदूषक घटकांवर मात करू शकतात, असे मत तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे.

औरंगाबाद : सायकली आणि पायी चालणाऱ्यांचे प्रमाण कमी  झाले आणि दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढली. या  वाहनांतून निघणारा धूर आणि घातक वायूंमुळे श्‍वसननलिकेचे,  डोळ्यांचे आजार होतात. याशिवाय इंधन ज्वलनामुळे वाहनाद्वारे होणाऱ्या प्रदूषक घटकांचे प्रमाण कमी करण्यासाठी व त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रदूषक घटक शोषून घेणाऱ्या वनस्पतींची लागवड करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पिंपळ, वड, अशोक, जांभूळ, आंबा अशी मोठ्या पानांची आणि गुलमोहर, चिंच, निंब अशा लहान व संयुक्‍त पानांची झाडे प्रदूषक घटकांवर मात करू शकतात, असे मत तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र  विभागातील प्रा. बी. एल. चव्हाण यांनी सांगितले, की इंधन  ज्वलनामुळे धूर, कर्बकणांबरोबरच अल्प-सूक्ष्म धातूकणांचे  प्रदूषण होते. वाहनाच्या इंधन ज्वलनातून कार्बन मोनॉक्‍साईड, सल्फर डाय ऑक्‍साईड, नायट्रॉक्‍स ऑक्‍साईड हे घातक वायू बाहेर  पडतात. कार्बन मोनॉक्‍साईड हा मानवी आरोग्याला अतिशय  घातक वायू आहे. यासाठी वाहनधारकांनी स्वत:च्या वाहनांची  नियमित निगा राखली पाहिजे. याशिवाय हे प्रदूषण कमी करण्यासाठी वनस्पतींचा वापर करायचा झाला तर रस्त्याच्या  कडेला उंच वाढणारी झाडे लावली पाहिजेत. कारण जेव्हा  वाहनातून धूर बाहेर पडतो तेव्हा तो वर जातो.

जर रस्त्याच्या  कडेला झाडे असतील तर वाहनातील धूर व प्रदूषक घटक उंच  जातील. यासाठी रस्त्याच्या कडेला उंच वाढणारी आणि डेरेदार  झाडे लावावीत. घरातील पर्यावरण चांगले ठेवण्यासाठी तसे  इनडोअर प्लॅंट निवडावेत. उद्यानातील झाडे जास्त काळ  हिरवीगार राहणारी, जाड पानांची लावावीत. गर्दीच्या ठिकाणी लावायची असतील तर रस्त्याच्या मधोमध उंच वाढणारी,  दुभाजकांमध्ये जास्त उंच न वाढणारी व पानगळ कमी होणारी  झाडे लावावीत. दुभाजकांमध्ये कन्हेर, बिट्टी, सदैव फुले येणाऱ्या  व दाट पाने असणाऱ्या कागदीफुलांची झाडे लावावीत. रहदारीला  अडथळा ठरत असतील तर त्यांची नियमित छाटणी करावी.  यामुळे प्रदूषण रोखण्याचे आणि रस्त्याच्या सुशोभीकरणाचे काम  ही झाडे करतील. वाहनांच्या धुरातून निघणारी प्रदूषके मानवी  आरोग्यास घातक असतात. प्रामुख्याने डोळ्यांना इजा करणारे व श्वसननलिकेचे रोग संभवतात. 

झाडांचे असे आहेत फायदे

  • चिंचेच्या पानासारख्या लहान व संयुक्त पानांच्या झाडांनी हवेचे  प्रदूषण अधिक उत्तमप्रकारे रोखले जाते. यात गुलमोहर, चिंच,  बाभूळ, यांचा विचार होतो. 
  • धूलिकण कमी करण्यासाठी आंबा, अशोक, वड, पिंपळ, जांभूळ  अशी मोठ्या पानांची झाडे अधिक उपयुक्त ठरतात. 
  • रेशीम, कडुनिंब, बहावा, बोर यांचा वापर गावाबाहेरच्या छोट्या  रस्त्यांवर हवा प्रदूषण रोधनासाठी अधिक उपयुक्त ठरतो. 
  • पिंपळ या झाडाचा उपयोग ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठीही  होतो. तसेच डस्ट पोल्युशन कमी करण्यासाठीही होतो. हवेतील  धूलिकण कमी करण्यासाठी हे झाड काम करत असते.  त्याचबरोबर हवा प्रदूषण सल्फर ऑक्‍साईड, नायट्रॉक्‍स ऑक्‍साईड  या हवेतील घातक वायूंना शोषणाचे काम हे झाड करत असते. 
  • अर्जुन वृक्ष हा लांब शेंगांचे जाळवणासारखे वाढतो. त्याची  पाने बारीक आणि दाट असतात. हवा प्रदूषणातील ऑक्‍साईड्‌स  हे घातक घटक शोषणास या झाडाचा उपयोग होतो. 
  • कडुनिंबाचे झाड हे हवेतील धूलिकण कमी करते. कडुनिंबातून  निघणारे सेंद्रिय हवा प्रदूषक काही घटक आहेत. त्याच्याशी  लिंबातील निघणाऱ्या सेंद्रिय घटकांशी या प्रदूषकांचा संयोग  होऊन ते घटक खाली पडतात व प्रदूषणाची तीव्रता कमी होते. 
  • बहावा हे वेगाने वाढणारे झाड असून, याची हवा प्रदूषक  रोधकता चांगली आहे. वातावरण बदलाला हे झाड लवकर सूचित  करते. झाडाला पिवळीधमक फुले मोठ्या प्रमाणात आली तर  त्यावर्षी चांगला पाऊस येण्याचे हे झाड संकेत देत असते. 
  • पारिजातक या झाडाच्या पानांमुळे हवा प्रदूषण कमी होते.  पारिजातकाच्या फुलांचा सुगंध येतो. हा सुगंध जेव्हा दरवळतो  तेव्हा त्या सुगंधाच्या कणांचा प्रदूषकांशी संयोग होतो तेव्हा ते  प्रदूषक स्थिरावतात. यामुळे प्रदूषण कमी होते. पारिजातकाच्या  झाडाचा प्रदूषण कमी करण्यासाठी आणि सुगंधासाठी असा दुहेरी  उपयोग होतो. 
  • औद्योगिक वायुप्रदूषण व महामार्गावरील वाहन प्रदूषणासाठी  दुतर्फा लागवडीसाठी वड, पिंपळ ही अतिशय योग्य झाडे असून,  या झाडांमुळे ध्वनिप्रदूषण, धुळीचे प्रदूषण आणि हवा प्रदूषण  रोखण्यासाठी मदत होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plants Reduce The  Intensity of Vehicle Hazardous Gases