पर्यावरण मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मनपाला जाग ; प्लास्टिक बंदीविरोधी मोहीम सुरु

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

उच्च न्यायालयाने बंदीवर शिक्कामोर्तब केला आणि व्यापाऱ्यांचा विरोध काहीसा मावळला. मात्र, हा निर्णय होऊनही दोन आठवडे गेले. तरीही नांदेड मनपाने प्लास्टिक कॅरिबॅग वा वस्तू बाळगणाऱ्यांविरुध्द कारवाई केली नव्हती.

नांदेड : प्लास्टिक वस्तू व कॅरिबॅगवर बंदी आणण्यावर राज्य सरकारने बंदी आणल्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम हे आजपासून नांदेड दौऱ्यावर आहेत. त्यामुळे मनपाला जाग आली असून, जुजबी कारवाई करुन प्लास्टिक कॅरिबॅग बाळगणाऱ्यांकडून २० हजारांचा दंड वसूल केला आहे.

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रस्तावानुसार, रामदास कदम यांनी राज्यभर प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू केला. त्यामुळे प्लास्टिक विक्रेते व उद्योजकांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली. मात्र, उच्च न्यायालयाने बंदीवर शिक्कामोर्तब केला आणि व्यापाऱ्यांचा विरोध काहीसा मावळला. मात्र, हा निर्णय होऊनही दोन आठवडे गेले. तरीही नांदेड मनपाने प्लास्टिक कॅरिबॅग वा वस्तू बाळगणाऱ्यांविरुध्द कारवाई केली नव्हती.

कदम हे नांदेडचे पालकमंत्री असल्याने व महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी ते नांदेडला येण्याचे निश्चित झाल्यानंतर मनपा यंत्रणेला जाग आली. नाही म्हणायला २८ एप्रिल रोजी मनपाच्या पथकाने चार ठिकाणी कारवाई करुन २० हजार रुपयांचा दंड वसूल केला़ सिडको झोनमध्ये मारुती स्वीटस्, बिलाल पान शॉपकडून प्रत्येकी पाच हजार रुपये, इतवारा झोनमध्ये महाराष्ट्रा स्वीटस् व दिल्ली स्वीटस्कडून प्रत्येकी ५ हजार रुपये असा एकूण २० हजार रुपये दंड वसूल केला.

या कारवाईत सहाय्यक आयुक्त संजय जाधव, अविनाश अटकोरे, मिर्झा फरतुल्लाह बेग, शिवाजी डहाळे, सुधीर इंगोले, जमील अहमद, मनपा पोलीस उपनिरीक्षक काझी यांनी भाग घेतला.

Web Title: Plastic Ban Environment Minister Ramdas Kadam Corporation