घाटीत रिकाम्या प्लॅस्टिक कॅनचा घोटाळा? 

योगेश पायघन
शनिवार, 7 जुलै 2018

औरंगाबाद : घाटीत डायलेसिस विभागात लागणाऱ्या लिक्विडच्या सुमारे दीड हजार रिकाम्या कॅन फुकटात नेण्याचा प्रकार कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे उजेडात आला. दरम्यान, दोन लोडिंग रिक्षा प्लॅस्टिक कॅन घेऊन पसार झाले; मात्र हा प्रकार कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्याने त्याने सुरक्षारक्षकाच्या मदतीने तिसरी रिक्षा अडवली; मात्र त्यानंतर पाचशे रुपयांची पावती फाडून प्लॅस्टिक बंदीच्या नावाखाली हा प्रकार शुक्रवारी (ता. 6) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दडपला गेला. 

या प्रकरणी रिक्षाचालकाला घाटीचे कर्मचारी भगवान सरपाते यांनी विचारणा केली असता, त्याने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने एका माजी आरएमओ व सहायक प्राध्यापक डॉक्‍टरला फोन लावला. वरदहस्त असलेले ते डॉक्‍टर घटनास्थळी आले आणि प्रकरण सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे प्रकरण अधीक्षकांकडे गेले. त्यांनी पाचशे रुपयांची पावती फाडण्याचे आदेश दिले; मात्र शासकीय कामकाजात निविदा काढून विक्री करण्याची पद्धत असताना केवळ पावती फाडून अभय दिल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. अगोदर परवानगी न घेता घाटीतून विक्रीसाठी प्लॅस्टिक कॅनच्या गाड्या बाहेर गेल्याच कशा, असा प्रश्‍नसुद्धा उपस्थित केला जात आहे. 

बंदीच्या नियमात नाही; तरीही पावती 
औषधी व घरगुती वापरातील प्लॅस्टिक कॅनवर बंदी नाही. त्याची रिसायकलिंगसाठी किंवा पुनर्वापरासाठी विक्री करण्यात येते, अशी माहिती याविषयी प्लॅस्टिक शॉप असोसिएशनचे ओमप्रकाश भुतडा यांनी दिली. असे असताना घाटीत प्लॅस्टिक बंदीच्या नावाखाली कॅन नेणाऱ्यांकडून पावती कशाची फाडली गेली, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

अधीक्षक म्हणतात... 
मूत्रपिंडविकार विभागात दोन खोल्या 20 लिटर क्षमतेच्या प्लॅस्टिक कॅननी भरलेल्या होत्या. प्लॅस्टिक बंदी असल्याने विल्हेवाट लावण्याचा प्रश्‍न होता. ती जागा रिकामी करण्यासाठी आपणच ते घेऊन जायला सांगितले होते. त्याची 500 रुपयांची पावती घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी दिली. 

Web Title: plastic used in ghati hospital