वक्‍फ बोर्डाच्या जमिनीवर प्लॉटिंगचा डाव - खालेक पेंटर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

बीड - वक्‍फ बोर्डाच्या इनामी (खिदमत माश) मालमत्ता खालसा करता येत नसतानाही बीडच्या शहेंशाहवली दर्ग्याची ९९ एकर जागा बनावट कागदपत्रांच्या आधारे खालसा करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते खालेक पेंटर यांनी केला आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा सुमारे तीन कोटींचा मावेजा संबंधित इनामदारांना न देता त्यातून दर्ग्याची दुरुस्ती आणि दर्ग्यासाठी नवीन जमीन खरेदी करावी अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

बीड जिल्ह्यासह राज्यभरात वक्‍फच्या मालमत्तांचे बेकायदा खरेदी-विक्रीचे प्रकार सर्रास घडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता.२२) बलभीम चौक भागातील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खालेक पेंटर पुढे म्हणाले की, वक्‍फ बोर्ड आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून दलालांनी वक्‍फच्या मालमत्ता गिळंकृत केल्या आहेत. बीडच्या शहेंशाहवली दर्ग्याला सुमारे ७०० एकर जमीन असून त्यातील ९९ एकर जमीन बनावट कागदपत्रांआधारे मदतमाश दाखवून खालसा करण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे या जमिनीची इनामी (खिदमतमाश) अशी नोंद महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात असतानाही उपजिल्हाधिकारी भू-सुधार यांनी ही ९९ एकर जमीन एकाच इनामदाराच्या नावे खालसा केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून हा प्रकार झाल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. 

या खालसा जमिनीपैकी काही जमीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ साठी संपादित केली आहे. त्यापोटी दोन कोटी ९७ लाखांचा मावेजा जिल्हाधिकारी कार्यालयात आला आहे. हा मावेजा इनामदारांना अथवा त्यांनी ज्यांना जमीन विकली त्यांना न देता त्यातील ५० लाख रुपये निधीतून दर्ग्याची दुरुस्ती करावी आणि उर्वरित रक्कम शासनाने स्वतःच्या खात्यात घेऊन दर्ग्यासाठी नवीन जमीन खरेदी करावी, बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, इनामी जमीन खालसा करणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही पेंटर म्हणाले.

जमिनीला सोन्याचा भाव
खालसा करण्यात आलेली जमीन तब्बल ९९ एकर आहे. यातील बहुतांश जमीन राष्ट्रीय महामार्गालगत आल्याने या जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. म्हणूनच या जमिनीची प्लॉटिंग करून विक्री करण्याचा भू-माफियांचा डाव असून त्याला अनेक राजकीय नेत्यांचाही आशीर्वाद असल्याचा आरोपही खालेक पेंटर यांनी केला आहे. या जमिनीचे आजचे बाजारी मूल्य ३० ते ४० कोटींपेक्षा अधिक असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

Web Title: ploting planning on waqf board