VIDEO : धार्मिक कार्याऐवजी करणार शाळेवर खर्च, पोखरीच्या ग्रामस्थांचा निर्णय 

Pokhari villagers' decision: An international standard school is practicing in villages
Pokhari villagers' decision: An international standard school is practicing in villages

औरंगाबाद - गावातील जिल्हा परिषद शाळेत गावातीलच मुले शिकतात. त्यामुळे शाळेत सोयी-सुविधेची जबाबदारी जिल्हा परिषदेएवढीच गावाचीही आहे. याच विचारातून जिल्ह्यातील पोखरी (ता. वैजापूर) येथील ग्रामस्थांनी या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्याचा चंग बांधला. त्या दृष्टीने कृतिशील पाऊलही उचलले असून, अवघ्या तीन महिन्यांत लोकसहभागातून 10 लाख रुपये जमा करून शाळेसाठी खर्चही केले. आता शाळेच्या विस्तारासाठी दोन एकर जागा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय गावात धार्मिक कार्यक्रमासाठी जमा केलेला निधीही शाळेवर खर्च करण्याचे ग्रामसभेत निश्‍चित केले.

जिल्हा परिषद शाळेचा दर्जा खालावत आहे, अशी ओरड ऐकायला मिळत आहे. त्यामुळे खासगी इंग्रजी शाळांकडे ओढा वाढला आहे; पण याला पोखरी येथील जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामस्थ अपवाद आहेत. लोकसहभागातून शाळेचे रूपडे पालटवण्याचे काम ग्रामस्थांनी हाती घेतले आहे. तीन महिन्यांत शाळेमध्ये इंग्रजी शाळांप्रमाणेच सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या; पण शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यासाठी लगतची जागा कमी पडत असल्याने विविध कामे करताना अडचणी येतील, असा विचार शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी व्यक्त केला. यावर मार्ग काढण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन दोन एकर जागा विकत घेण्याचा ठराव पारित केला. त्या दिशेने आता कामही सुरू आहे. 

व्हॉट्‌सऍपद्वारे 10 मिनिटांत 50 हजार 
या शाळेत संगणक प्रयोगशाळेसाठी पैसे कमी पडत होते. ही बाब कळताच गावातील युवकांनी व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून आवाहन करीत अवघ्या 10 मिनिटांत 50 हजार रुपये जमा करून शाळेला दिले; तसेच गावातील विविध धार्मिक कार्यक्रमासाठी जमा केलेला निधीही शाळेसाठी खर्च करण्याचा सभेत निर्णय घेण्यात आला. 

जागेसाठी असा उभारणार निधी 
शाळेसाठी दोन एकर जागा लोकसहभागातून घेतली जाणार आहे. त्यासाठी गावातील प्रत्येक घरातून पाच हजार, शेती असणाऱ्या कुटुंबाकडून एकरी एक हजार रुपये प्रमाणे निधी जमा करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. यातून 30 लाख रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट आहे. शिवाय गावातील शासकीय/अशासकीय सेवेत उच्चपदावर असलेल्या भूमिपुत्रांनी प्रत्येकी एक लाख रुपये देऊ केले आहेत. 

मागील वर्षी पोखरी शाळेतील 11 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. शाळेतील शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असले तरी विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची धडपड आहे. दोन एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभारण्यासाठी ग्रामस्थांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी एखादी स्वसंसेवी संस्था किंवा सीएसआरच्या माध्यमातून पुढाकार घेतल्यास पोखरीचे आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्याचे स्वप्न आकारास येऊ शकेल. यासंदर्भात बुधवारी (ता.18) मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर पोखरी शाळेला भेट देऊन पाहणी करणार आहेत. 
- सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com