गुंगारा देऊन पळालेले दोघे भाऊ अटकेत; भाग्यनगर पोलिसांची कारवाई

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

राजू राऊतने त्याप्रकरणातील चोरलेला लॅपटॉप आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. राजू राऊतचे लहान भाऊ अभिजीत उर्फ अभय राऊत (वय १९) आणि दुसरा अल्पवयीन यांनाही भाग्यनगर पोलिसांनी फक्त चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

नांदेड : पुणे येथून घरफोडी प्रकरणात आरोपी असलेल्या दोन भावांना भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे ताब्यात घेऊन आणले होते. परंतु पोलिसांना गुंगारा देऊन त्यांनी तीन दिवासांपूर्वी पलायन केले होते. या दोघांनाही भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने पुन्हा पुणे येथून अटक केली. 

शहरातील बेलानगर भागात झालेल्या एका चोरी प्रकरणी पोलिस उपाधिक्षक (शहर) अभिजीत फस्के आणि भाग्यनगरचे पोलिस निरीक्षक अनिरूध्द काकडे यांच्या आदेशावरून पोलिस उपनिरीक्षक चित्तरंजन ढेमकेवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे येथून राजू राऊत या युवकाला पकडून आणले होते. राजू राऊतने त्याप्रकरणातील चोरलेला लॅपटॉप आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. राजू राऊतचे लहान भाऊ अभिजीत उर्फ अभय राऊत (वय १९) आणि दुसरा अल्पवयीन यांनाही भाग्यनगर पोलिसांनी फक्त चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलिस गाडीतून आपल्याला उलटी आली असा बहाणा करून खाली उतरले आणि पोलिसांची नजर चुकवून त्यांनी पोबारा केला. या दोघांना कोणत्याही गुन्ह्यात अटक झालेली नव्हती. तरीही त्यांच्या विरुद्ध श्री. ढेमकेवाड यांच्या फिर्यादीवरुन भादवीच्या कलम २२४ नुसार शासकीय रखवालीतून पळून गेल्या प्रकरणी वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याबाबतचा तपास वजिराबादचे पोलीस उपनिरीक्षक विक्रम हराळे हे करीत आहेत.

Web Title: Police arrested the two brothers who was absconding