पोलिसांनी पकडला तांदळाचा ट्रक, पंचनाम्यात मात्र दाखविली दुचाकी!

Ration Rice Scam In Ashati
Ration Rice Scam In Ashati

आष्टी (जि.बीड) : रेशनचे धान्य असल्याच्या संशयावरून आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व नंतर महसूलच्या पंचनाम्यानंतर सोडून दिलेल्या तांदळाच्या ट्रकबाबत धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पंचनाम्यात ट्रकच्या क्रमांकाऐवजी त्याला मिळताजुळता क्रमांक टाकण्यात आला असून, तो चक्क दुचाकीचा आहे! ट्रकचालक-मालक व सर्व संबंधित धान्यमाफियांचे नाव गुप्त ठेवण्यासाठी तर ही चलाखी करण्यात आली नाही ना, त्यामुळे असा संशय बळावला आहे.


आष्टी पोलिस गस्तीवर असताना ता. दोन ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास एक संशयास्पद ट्रक (एमएच २३ एयू ०४९५) कडा येथे पकडला. त्यात ५० किलो वजनाच्या ३६० गोण्यांमध्ये १८० क्विंटल तांदूळ होता. चालकाकडे धान्याची कोणतीही कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी रेशनचे धान्य असल्याच्या संशयावरून ट्रक आष्टी पोलिस ठाण्याच्या आवारात आणून लावला. दरम्यान, ट्रकमधील तांदळाचा पंचनामा होईपर्यंत आठवडा उलटला.  या कालावधीत धान्य माफियांनी पोलिस व तहसीलमध्ये हेलपाटे मारल्याचे दिसून आले. अखेर आष्टी तहसीलमधील पुरवठा अधिकारी यांनी ट्रकमधील तांदूळ रेशनचा नसल्याचा पंचनामा अहवाल दिला.

त्यामुळे ट्रक सोडण्यात आला. परंतु ट्रकचालक, मालक, धान्य कोठून कुठे चालले होते, याबाबत कोणतीही माहिती उघड करण्यात आली नाही. महसूलने पोलिस ठाण्यात ट्रकचा पंचनामा चालक व मालकांच्या गैरहजेरीत करण्यात आला असून त्यात ट्रकच्या (एमएच २३ एयू ०४९५) या क्रमांकाशी मिळताजुळता (एमएच-२३-एव्ही-०४९५) असा वाहन क्रमांक दाखविण्यात आला आहे. याची वाहन नोंदणी वेबसाईटवर खातरजमा केली असता एमएच-२३-एव्ही-०४९५ हा क्रमांक ट्रकएवजी दुचाकी वाहनाचा तर एमएच २३-एयू-०४९५ हा अशोक लेलॅण्ड कंपनीच्या ट्रकचा असल्याचे पुढे येत आहे.


या प्रकरणातील धान्य माफियांना वाचविण्यासाठी सोयीचा पंचनामा केल्याचा आरोप होत असतानाच वाहन क्रमांकाच्या या हेराफेरीमुळे त्याला एकप्रकारे पुष्टीच मिळत आहे. याबाबत पुरवठा शाखेत विचारले असता, पोलिसांनी या कार्यालयात याच क्रमांकाचे पत्र दिले असून त्यानुसारच पुन्हा पोलिस विभागाला पत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये प्रिंटींग मिस्टेक झाली असावी, असे सांगण्यात आले.

पंचनाम्याचा ‘आष्टी पॅटर्न’?
आठ दिवसांनी झालेल्या या पंचनाम्यानंतर ट्रक सोडून देण्यात आला. परंतु माल रेशनचा नव्हता तर ट्रकचा मालक कोण? माल कोठून आला होता, कुठे चालला होता यासह अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिल्याने संशयाचे धुके पंचनाम्यानंतरही कायम आहे. त्यात आता वाहन क्रमांकाची हेराफेरी होऊन ट्रकऐवजी दुचाकीचा क्रमांक आल्याने नाव-गाव गुप्त ठेवण्यासाठी पंचनाम्याचा हा नवा ‘आष्टी पॅटर्न’ तर अस्तित्त्वात आला नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सुरुवातीपासून संशय
पोलिसांनी पकडलेल्या संशयित ट्रकमध्ये काळ्या व पांढर्या गोण्यांमध्ये प्रत्येकी ५० किलो असा १८० क्विंटल तांदूळ होता. त्यापैकी पांढऱ्या गोण्यांवर खासगी कंपनीचे नाव असून काळ्या गोण्यांवर छपाई नाही. त्यामुळे हा तांदूळ शासकीय योजनेचा नसल्याचा अजब अंदाज आष्टी पुरवठा विभागाने लावला. परंतु पांढऱ्या गोण्यांवर खासगी कंपनीचे नाव असले तरी काळ्या गोण्यांवर छपाई नसल्याने या गोण्या कोठून आल्या हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com