पोलिस सायबर लॅबमुळे गुन्हेगारीला प्रतिबंध शक्‍य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

औरंगाबाद - आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात पोलिस यंत्रणेच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने औरंगाबादेत पोलिस सायबर लॅबची स्थापना महत्त्वाचे पाऊल असून वाढत्या गुन्हेगारीला अधिक तत्परतेने प्रतिबंध घालणे या अद्ययावत सायबर लॅबमुळे शक्‍य होईल, असे प्रतिपादन पर्यावरण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.

औरंगाबाद - आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात पोलिस यंत्रणेच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने औरंगाबादेत पोलिस सायबर लॅबची स्थापना महत्त्वाचे पाऊल असून वाढत्या गुन्हेगारीला अधिक तत्परतेने प्रतिबंध घालणे या अद्ययावत सायबर लॅबमुळे शक्‍य होईल, असे प्रतिपादन पर्यावरण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.

औरंगाबादेत शहर व ग्रामीण अधीक्षक कार्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या पोलिस सायबर लॅबचे उद्‌घाटन पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते सोमवारी (ता. 15) झाले. खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, विशेष पोलिस महानिरीक्षक (औरंगाबाद परिक्षेत्र) अजित पाटील, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, आमदार अतुल सावे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, महापौर त्र्यंबक तुपे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, पोलिस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण नवीनचंद्र रेड्डी यांची उपस्थिती होती.

गृहविभागातर्फे स्वातंत्र्यदिनी एकाच दिवशी संपूर्ण राज्यात 51 ठिकाणी पोलिस सायबर लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. वाढती सायबर गुन्हेगारी नष्ट करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल टाकलेले आहे. असे सांगून श्री. कदम म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असून या परिस्थितीत कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलिस तपास यंत्रणेला आजच्या काळात सायबर लॅबसारख्या महत्त्वाच्या अत्याधुनिक यंत्रणा अत्यावश्‍यक ठरणाऱ्या आहेत असे ते म्हणाले.

पोलिसांनी अत्याधुनिक तपास साधनांच्या साहाय्याने दक्षतेने काम करणे गरजेचे असल्याने गृहविभागाचा सायबर सेल हा महत्त्वपूर्ण उपक्रम असून यामुळे समाजाला अद्ययावत यंत्रणेच्या साह्याने सुरक्षा देणे शक्‍य होणार आहे, असे खासदार खैरे म्हणाले. डॉ. दांगट यांनी, नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पोलिस दल, सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत असणे आवश्‍यक आहे, त्या दृष्टीने सायबर लॅब हे उपयुक्त व परिणाम साधणारे माध्यम असल्याचे सांगितले. विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील यांनी सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी अद्यावत सॉफ्टवेअर, प्रशिक्षित अधिकारी आणि आधुनिक यंत्रणेचा वापर या सायबर लॅबमध्ये केला जाणार असल्याचे यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी केले.

Web Title: Police could prevent cyber crimes lebamule