वडापाववर दिवस काढून पोलिसांनी आवळल्या मुसक्‍या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

औरंगाबाद - टोळीतील संशयित एकमेकांना ओळखतही नव्हते. केवळ एकाच्या सांगण्यावरून हा ‘उद्योग’ सुरू असायचा. एकच जण सर्वांशी साध्या मोबाईलद्वारे संपर्कात राहत होता. या गुन्ह्यात प्रत्येकावर जबाबदारी वाटून दिली गेली होती. आधारकार्डची हेराफेरी करणारा, चेकचे क्‍लोनिंग करणारा, बॅंकेतून पैसे काढणारा असे ठरलेले होते. 

औरंगाबाद - टोळीतील संशयित एकमेकांना ओळखतही नव्हते. केवळ एकाच्या सांगण्यावरून हा ‘उद्योग’ सुरू असायचा. एकच जण सर्वांशी साध्या मोबाईलद्वारे संपर्कात राहत होता. या गुन्ह्यात प्रत्येकावर जबाबदारी वाटून दिली गेली होती. आधारकार्डची हेराफेरी करणारा, चेकचे क्‍लोनिंग करणारा, बॅंकेतून पैसे काढणारा असे ठरलेले होते. 

चार दिवस डोळ्यांत तेल घालून, केवळ वडापाव खाऊन पोलिसांनी या पाच संशयितांना अटक केली. ते विविध राज्यांतील आहेत. मनीषकुमार हा गॅंगमधील सर्वांना ओळखत होता. तो त्यांच्याशी साध्या मोबाईलवरून संपर्क साधायचा. त्यांना कामे वाटून दिली गेली होती. गुजरातेत गंडवल्यानंतर या टोळीने औरंगाबादकडे लक्ष वळविले. त्यासाठी कुडाळ येथील सहावा साथीदार हरीश गुंजाळ याच्या रूपात त्यांना सापडला. त्याचे व रेल्वेस्थानकावर भेटलेल्या मुलाचे आधारकार्ड वापरून संशयितांनी शहरातील बॅंकेत खाते उघडण्याचा सपाटा लावला. येथील हरीश एंटरप्रायजेस नावाने टीजेएसबी बॅंकेत खाते उघडून गोजीत फायनान्सिअल सर्व्हिसेसच्या चेकचा क्‍लोन तयार केला. हा चेक वटवून घेत खात्यातून परस्पर पैसे उचलले. पैसे कपात झाल्याने गोजीत फायनान्सिअलकडून बॅंकेला विचारणा झाली. अशीच एक तक्रार मुख्य शाखेकडे आली. त्यानंतर स्थानिक शाखेने यात तपास केला, त्यावेळी हरीश एंटरप्रायजेसने जमा केलेला चेक क्‍लोनिंग केल्याचे समोर आले. त्यानंतर शाखा व्यवस्थापक संग्राम शिंदे यांनी पोलिस आयुक्तांना तक्रार दिली.

अशी होती शक्कल
ज्या शहरात बॅंका, फर्म, कंपनीला टार्गेट करायचे त्या शहरात संशयित खोली भाड्याने घेत होते. भाडेकराराची कागदपत्रे व पत्ता वापरून दुकान परवाना, जीएसटी क्रमांक मिळवला जात होता. त्यानंतर बॅंकेत खाते उघडून चेकबुक प्राप्त होताच बॅंकेतील मोठे ग्राहक शोधून त्यांचा खाते व चेकक्रमांक मिळवून त्यांची क्‍लोनिंग केली जायची. त्यावर बनावट सही करून बॅंकेतून चेक वटविले जात होते.

येथून तपासाला सुरवात
गुन्हे शाखा पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू केला. एका संशयिताला पकडल्यानंतर पोलिसांनी पाठोपाठ नाट्यमयरीत्या चौघांना पकडले. यात दोघे विमानाने मुंबईला पोचले होते. त्यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या.

साहित्य जप्त
  २७ एटीएम, १५ मोबाईल
  २६ चेकबुक, रबरी शिक्के 
  विविध नावाचे ३० चेक-पॅनकार्ड
  पैसे मोजण्याचे मशीन
  संगणकाचे सिपीयू, प्रिंटर
  निवडणूक ओळखपत्र व इनोव्हा कार
  १ लाख ७६ हजार ९२० रुपये

महत्त्वाचा प्रश्‍न अनुत्तरित
चेक निर्मितीसाठी पाच कोटींची गुंतवणूक आवश्‍यक असते. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार, चेक निर्मितीसाठी नोंदणी तसेच चोख सुरक्षा यंत्रणा लागते. भारतात पाच ते सहा प्रिंटर आहेत. त्यामुळे संशतियांकडे प्रिंटर होते का? असेल तर ते कुठून आले? हे प्रश्‍न अनुत्तरित आहेत.

Web Title: police crime