नांदेड : बनावट दारु अड्डा उद्ध्वस्त

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

बनावट व आरोग्याला घातक असलेली देशी व विदेशी दारु तयार करणाऱ्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केली.

नांदेड : बनावट व आरोग्याला घातक असलेली देशी व विदेशी दारु तयार करणाऱ्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केली. यावेळी पथकाच्या हाती मोठे बनावट दारुचे घबाड लागले असून, दोघांना अटक केली. घटनास्थळावरून सव्वाआठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई इवळेश्‍वर (ता. माहूर) येथे बुधवारी (ता. १६) दुपारी केली. 

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. निवडणूक अंतिम टप्प्यात येत असल्याने अवैध व बनावट दारु विक्रीचे प्रकार सुरु आहेत. या कालावधीमध्ये अवैध देशी दारू बनावट विक्रीसंदर्भात मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त प्राजक्ता लवांगरे (वर्मा) विभागीय आयुक्त प्रदीप पवार व जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता. १६) जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ईवळेश्वर (ता.माहूर) येथील बनावट देशी दारू व विदेशी दारू बणविणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून स्पिरिट (R.S) 280 लीटर, बनावट देशी मद्य ९७ लीटर, एक चार चाकी वाहन, रिकाम्या बॉटल्स, बनावट बुच असा आठ लाख २९ हजार ९४४ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

ऐननिवडणुकीत केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले आहे. सदर कारवाईमध्ये निरिक्षक एस. एम. बोदमवाड, डी. एन. चिलवंतकर, एस. एस. खंडेराय, बी. शेख, बी. एस. पडूळ, वाय. एस. लोळे, एस. के. वाघमारे, आर. जी. सूर्यवंशी, के. के. किरतवाड, जवान यू. डी. राठोड, श्री. भालेराव, खतीब, पवार, राठोड, महिला जवान घुगे यांनी परिश्रम घेतले. पथकातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलेश सांगडे यांनी अभिनंदन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Destroyed Fake Alcohol making Center in Nanded