पोलीस दलाने उधळला कर्तव्याचा रंग...

Nanded News
Nanded News

नांदेड : सर्वसामान्यांच्या खुशीत आमची खुशी, असे समजून नांदेड जिल्हा पोलिस दलाने आज कडेकोट पोलीस बंदोबस्त दिल्याने जिल्ह्यात सर्वत्र धुळवड व होळीचा सण उत्साहात व शांततेत पार पडला.

दिवाळी, दसरा, शिमगा असो वा पाडवा, ईद असो अथवा बुद्धजयंती, कोणत्याही सणाच्या दिवशी पोलिसांना सुट्टी नसते. आजही होळीच्या दिवशी पोलीस कर्तव्य बजावत होते. एकीकडे रंगाची धुळवड उडत होती. रंगीबेरंगी चेहरे सर्वत्र हसत-खेळत फिरत होते तर पोलिस मात्र कर्तव्याचा रंग उडवत होळी साजरी करत होते.

आज होळी उत्सव नांदेड शहर आणि जिल्ह्यात प्रचंड आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. भल्या सकाळपासून रंगाची उधळण करण्यात आली. कोरोना व्हायरसची  दहशत झुगारून देत बच्चे कंपनी ही रंग उत्सवात सहभागी झाली होती. नगरा-नगरात, रस्त्या-रस्त्यावर, गावा-गावात, गल्लीबोळातही रंगपंचमीचा रंग जोरदार उडत होता. अशावेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस दल डोळ्यात तेल घालून रस्त्यावर उभा होता. 

नांदेड शहरातील चौका-चौकात पोलिसांचा खडा पहारा होता. एखादा दारू पिऊन पडू नये, एखाद्याचे भांडणे होऊ नयेत कायदा आणि सुव्यवस्था न बिघडता होळीचा रंग आनंदाने उडवता यावा यासाठी पोलीस विभाग कर्तव्य बजावत होते. वाहतूक शाखेवर वाहतूकीचा ताण कमी असला तरी वाहतुक शाखा दिवसभर रस्त्यावर होती. रस्त्यावरती दंगामस्ती आणि बाईक स्टंट करणाऱ्यांना आजही वाहतूक शाखेचे कर्मचारी आणि पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी दंड ठोठावत जवळपास ४०० हून अधिक कारवाया केल्या. 

सांगवी आसना बायपास चौकापासून ते बर्की चौकापर्यंत, सिडको-हडकोच्या परिसरापासून गुरुद्वारा चौकापर्यंत, मालेगाव रोडपासून छत्रपती चौकापर्यंत व नांदेड शहरातील प्रत्येक  चौकाचौकात आणि बंदोबस्तावर कर्तव्य बजावताना दिसून आले. पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क कक्षानेही आपले कर्तव्य पार पाडले. कर्तव्यावर असणाऱ्या काही पोलीसांशी संपर्क साधला, यावेळी बोलताना प्रत्येक जण आनंदाने होळी साजरा केला पाहिजे, लोक सुखी- समाधानाने, आनंदाने जगले पाहिजे त्यासाठी खाकीचा रंग सगळ्यांच्या सुरक्षितेसाठी सदैव तत्पर असल्याचे सांगण्यात आले.

आपल्या घरातील आई, वडील, पत्नी, मुल, नातेवाईक आणि मित्रांनाही वेळ देता न येणारे पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर तैनात होते. इतरांच्या समाधानात, आनंदात आनंद मानणाऱ्या पोलीस दलाच्या आजच्या कर्तव्याच्या रंगाचे सर्वसामान्य लोकांमधून हे कौतुक होताना दिसून येते.  कर्त्याव्याच्या ‘ खाकी ‘ रंगाला आणि सर्व पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड व विजय पवार यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com