esakal | मुंबईहून परतलेल्या २७ जणांना घेतले चेकपोस्ट पोलिसांनी ताब्यात 
sakal

बोलून बातमी शोधा

checkpost

नालासोपारा (मुंबई) येथून पिकअप जीपमधून घरी परत येत असलेल्या २७ जणांना देवगाव फाटा येथील जिल्हा नाकाबंदीत चेकपोस्टच्या पोलिसांनी शुक्रवारी (ता.तीन) ताब्यात घेतले.

मुंबईहून परतलेल्या २७ जणांना घेतले चेकपोस्ट पोलिसांनी ताब्यात 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जिंतूर ः नालासोपारा (मुंबई) येथून पिकअप जीपमधून घरी परत येत असलेल्या २७ जणांना देवगाव फाटा येथील जिल्हा नाकाबंदीत चेकपोस्टच्या पोलिसांनी शुक्रवारी (ता.तीन) ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना चौदा दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले. तत्पूर्वी चेकपोस्टवरील पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सर्वांना जिंतूर तहसीलच्या ताब्यात देण्यात आले.

ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक रविकिरण चांडगे यांनी त्यांची तपासणी करून त्यांना शहरातील एका वसतिगृहात चौदा दिवसांकरिता होम क्वारंटाईन करण्यात आले. शुक्रवारी (ता.तीन) सकाळी आठच्या दरम्यान जिंतूर-औरंगाबाद महामार्गावर तालुक्यातील देवगाव फाटा येथील जिल्हा हद्द नाकाबंदीत चौकशी दरम्यान पिकअप जीप (क्र.एमएच ४८ - एजी ०२१६) मध्ये नालासोपारा येथून परतलेल्या २७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

जिंतूर तहसील कार्यालयाकडे दिले ताब्यात
येथे मंडळ अधिकारी एन.आर.सोनवणे आणि आरोग्य विभागातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या आदेशान्वये त्या सर्वांना येथील तहसील कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आले. हे सर्वजण हिंगोली व रिसोड तालुक्यातील असल्याचे समजले. 

हेही वाचा - येथील भिक्षुक, निराधारांना मिळाले सुखाचे दोन घास, कोणामुळे ते वाचा...

दिल्लीतून परतलेला एकजण पाथरीच्या आयसोलेशन कक्षात
पाथरी ः दिल्ली येथे धार्मिक कार्यक्रमा निमित्ताने वास्तव्यास आलेल्या पाथरी येथील एकास प्रशासनाने गुरुवारी (ता.दोन) रात्री होम कॉरन्टाइन केले होते. त्यानंतर शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास त्या व्यक्तीला आरोग्य विभागाने पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात दाखल केले असून त्याचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. पाथरीतील एक व्यक्ती (ता.एक जानेवारी ते चार मार्च) या काळात दिल्लीत वास्तव्यास होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार (ता.दोन) एप्रिलला सदर व्यक्तीस होम कॉरन्टाईन केले होते तर आज (ता.तीन) सदर व्यक्तीला तहसील कार्यालयात बोलावून कुटुंबातील सदस्यांची माहिती घेत ग्रामीण रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करत त्या व्यक्तीचे स्वॅब नमुने तपासनीस पाठविल्याची माहिती डॉ. सुमंत वाघ यांनी दिली.

हेही वाचा - या’ कारणांमुळे होऊ शकते परभणीत पाणीटंचाई

दोन संशयितांसह बारा जण रुग्णालयात
सोनपेठ ः सोनपेठ शहरातून (ता.दोन) दोन संशयितांसह बारा जणांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. यामधील एका वयोवृद्ध तसेच एका तरुणाचे स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. संबधित संशयित हे परराज्यातील असून सोनपेठ येथे एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने थांबले होते. या सर्वांवर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर हालगे, डॉ. कल्पेश लांडे, डॉ. मृणाल देशमुख तसेच आरोग्य कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत.