बीडला पंधरा हजारांची लाच घेताना  पोलिस अधिकारी, जमादार जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 April 2020

नेकनूर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी एक वाळूचा ट्रॅक्टर पकडला होता. हा ट्रॅक्टर सोडण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक सचिन पुंडगे व हेड कॉन्स्टेबल माणिक तांदळे यांनी १५ हजारांची लाच मागितली.

बीड - वाळूचा ट्रॅक्टर सोडण्यासाठी १५ हजारांची लाच घेताना सहायक पोलिस निरीक्षकासह एका जमादारास बुधवारी (ता. २९) लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. अधिकाऱ्याच्या घरीच ही कारवाई करण्यात आली. 

सहायक पोलिस निरीक्षक सचिन पुंडगे व हेड कॉन्स्टेबल माणिक तांदळे अशी लाच घेताना पकडलेल्यांची नावे आहेत. नेकनूर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी एक वाळूचा ट्रॅक्टर पकडला होता. हा ट्रॅक्टर सोडण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक सचिन पुंडगे व हेड कॉन्स्टेबल माणिक तांदळे यांनी १५ हजारांची लाच मागितली.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

याबाबत ट्रॅक्टरमालकाने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. बुधवारी सचिन पुंडगे यांच्या घरीच लाच घेण्याचे ठरल्यावरून सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून लाच घेताना दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police officers caught taking bribe of Rs 15,000