हिंगोलीत बॅंक कर्मचाऱ्यांना पोलिसांची धास्‍ती

राजेश दारव्हेकर
गुरुवार, 26 मार्च 2020

बॅंक कर्मचाऱ्यांना बॅंकेत जाण्यासाठी विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक कर्मचारी बँकेत जाताना गळ्यात ओळखपत्र टाकून जात आहेत. मात्र पोलिसांकडून त्‍याची शहनिशा केली जात नाही. यामुळे बँक कर्मचाऱ्यांत भिती निर्माण झाली आहे. बॅंक कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने पासेस उपलब्ध करून द्याव्यात,अशी मागणी होत आहे.

हिंगोली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात संचारबंदी सुरू आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद आहेत. तसेच आता शहरात तीन तासच अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडी ठेवण्यात येत आहेत. बँका अत्यावश्यक सेवेत आहेत. मात्र शहरासह तालुक्‍यात संचारबंदीमुळे कर्मचाऱ्यांना त्‍यांच्या शाखेपर्यंत पोचण्यास अडचणी येत आहेत. बॅंक कर्मचाऱ्यांना पोलिसांच्या लाठीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने बॅंक कर्मचाऱ्यांना पासेस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी बॅंक कर्मचाऱ्यांतून केली जात आहे. 

देशात कोराना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोना आजाराला नियंत्रणात आणण्यासाठी संचारबंदी सुरू आहे. पाच व्यक्‍ती एकाठिकाणी जमण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. केंद्र, राज्य शासनासह जिल्हा प्रशासनही विविध उपाययोजना राबवित आहे. आरोग्य विभागासह पोलिस प्रशासनही दक्ष आहे. सध्या बँकांचे आर्थिक वर्षाचे व्यवहार (ता.३१) मार्चपर्यंत पूर्ण करणे अपेक्षीत आहेत. 

हेही वाचा - Video : कर्तव्यावरील महिला कर्मचाऱ्यालाच महिला पोलिसांचा दंडुका

बँक कर्मचाऱ्यांत भीती

या बाबत आर्थिक वर्ष पुढे ढकलण्यात येत असल्याचे तोंडी सांगितले जात आहे. मात्र त्‍याचे लेखी पत्र अद्यापही बँकांना मिळालेले नसल्याचे बँक कर्मचारी सांगत आहेत. दरम्यान, बॅंक कर्मचाऱ्यांना बॅंकेत जाण्यासाठी विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक कर्मचारी बँकेत जाताना गळ्यात ओळखपत्र टाकून जात आहेत. मात्र पोलिसांकडून त्‍याची शहनिशा केली जात नाही. यामुळे बँक कर्मचाऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. तालुक्‍याच्या ठिकाणी असलेल्या बँकेचे कर्मचारी जिल्‍हा मुख्यालयी राहून ये-जा करतात. 

ग्राहकांना बँक प्रशासनाच्या सूचना 

अशा कर्मचाऱ्यांना अडचणीना सामोरे जावे लागत आहे. ठिकठिकाणी उभे असलेल्या पोलिसांना सांगत जावे लागत आहे. त्‍यासाठी अडचणी देखील येत आहेत. दरम्यान, बँकेत येणाऱ्या ग्राहकांत अंतर ठेवल्या जात नाही. बँक प्रशासन सतत ग्राहकांना सूचना करीत आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष होत केले जात आहे. शहरात किराणा दुकानाला ज्या प्रमाणे एक मीटरचे आळे मारून दिले आहेत. त्याप्रमाणे बँकेत देखील एक मीटर अंतर दोन ग्राहकांत राहिल याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. 

येथे क्लिक कराहिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिके आडवी

जिल्‍हा प्रशासनाने पासेस द्याव्यात

बँकेच्या कर्मचाऱ्यांना जिल्‍हा प्रशासनाने पासेस द्याव्यात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना संचारबंदीच्या काळात बँकेत जाण्यास अडचणी येणार नाहीत. तसेच बँकेत होणारी गर्दी कमी करण्यासाठी दोन व्यक्‍तीत अतंर ठेवण्याच्या सूचना सतत दिल्या जात आहेत. मात्र, त्‍याचे पालन होत नाही. याकडे देखील प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. 
- उत्तम होलीकर, उपाध्यक्ष, बॅंक कर्मचारी संघटना
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police scare off bank employees in Hingoli