प्रशासनाला सहकार्य करा : पालकमंत्री वर्षा गायकवाड

राजेश दारव्हेकर
मंगळवार, 7 एप्रिल 2020

नागरिकांनी सहकार्य करत प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करावे. घरातच राहा, आपली व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची दक्षता घ्या, संचारबंदीच्या कालावधीत घरातून कोणीही बाहेर पडू नका, असे आवाहन पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

हिंगोली : कोरोनाचा संसर्ग रोखणे हेच सध्या आपल्या सर्वांचे प्राधान्य आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रशासनाने जे प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहेत. त्याचे जिल्ह्यातील जनतेने काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

जिल्ह्यात एक कोरोना रुग्ण (पॉझिटिव्ह) असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तसेच खबरदारी म्हणून काही नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. या संदर्भात आरोग्य विभागाकडून सर्व प्रकारची दक्षता घेतली जात आहे.

हेही वाचा - केळीला मिळतोय केवळ अडीचशे रुपये भाव

आदेशाचे पालन करावे

 संचारबंदीच्या काळात शासन आणि प्रशासन या बाबतीत सतर्क असून जिल्ह्यातील जनतेच्या हितासाठी योग्य नियोजन करण्यात येत आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करत प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करावे. घरातच राहा, आपली व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची दक्षता घ्या, संचारबंदीच्या कालावधीत घरातून कोणीही बाहेर पडू नका, असे आवाहन पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. 

आरोग्य तपासणी करून घ्यावी

तसेच दिल्ली, पानिपत (हरियाणा), राज्यस्थान, उत्तर प्रदेश व देशाच्या इतर भागात झालेल्या धार्मिक कार्यक्रमांस जिल्ह्यातील नागरिक जाऊन आले आहेत. त्या सर्व नागरिकांनी स्वतःहून समोर येऊन आपली माहिती जिल्हा प्रशासनास देऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, जिल्हा प्रशासनातर्फे योग्य ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आवाहनही पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

हिंगोलीत मदत संकलन केंद्र

हिंगोली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या संचारबंदी, जमावबंदी तसेच सीमा बंदी या उपाययोजनेमुळे परप्रांतीय नागरिक अडकून पडले आहेत. तसेच मजुरांची कामे बंद झाल्याने त्‍यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात अशा गरजूंना मदत मिळत आहे. परंतु, ही सेवा नियमित सुरू ठेवण्यासाठी नगरपालिकेने मदत संकलन केंद्र सुरू केले आहे. दानशूर व्यक्‍तींनी पुढाकार घेत मदत करण्याचे आवाहान नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

येथे क्लिक करा - हिंगोलीकरांना पुन्हा मिळाला दिलासा

गरजूपर्यंत अन्न पुरविण्याचे आवाहन

शहरात कोणी उपाशी राहू नये, यासाठी सामाजिक संस्‍था, मंडळे. लोकप्रतिनिधी, अन्नदाते आदींना आवाहन करून गरजूपर्यंत अन्न पुरविण्याचे आवाहन नगरपालिकेने केले होते. त्‍याला प्रतिसाददेखील मिळाला असून शहरातील गरजूंना अन्नधान्य व भोजनाची पाकिटे मिळाली आहेत. संचारबंदीचा कालावधी (ता. १४) एप्रिलपर्यंत असल्याने शहरातील गरजूंना नियमित अन्नधान्य व भोजन मिळावे यासाठी पालिका प्रशासनाने आता मदत संकलन केंद्र सुरू केले असून दानशूरांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दानशूर कुटुंबांनी मदत करावी

 कोणीही घराबाहेर न पडताही मदत करता येणार आहे. त्यासाठी पालिकेकडे संपर्क केल्यास कर्मचारी घरपोच येऊन मदत स्वीकारतील. यासाठी तांदूळ, गहू, डाळी, साबण, टूथपेस्ट, बिस्किट, नवीन कपडे आदी साहित्याची मदत करता येणार आहे. ज्यांना आर्थिक मदत करायची असेल त्यांनाही मुख्यमंत्री कोरोना रिलीफ फंडामध्ये जमा करता येणार आहे. दानशूर कुटुंबांनी मदत करावी, असे आवाहन मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Support the Administration: Guardian Minister Varsha Gaikwad Hingoli news