अवैध धंदे व गुन्हेगारांवर करडी नजर ठेवणार - पोलिस अधिक्षक जाधव

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

जिल्ह्याचा चांगला अभ्यास असून त्याचा फायदा यापुढे कायदा व सुव्यवस्था राखण्यास करता येणार आहे. तसेच, अवैध धंदे व गुन्हेगारांवर कडक नजर ठेवणार असून अशा प्रवृत्तीला ठेचून काढणार असा सज्जड इशारा पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला.

नांदेड- जिल्ह्याचा चांगला अभ्यास असून त्याचा फायदा यापुढे कायदा व सुव्यवस्था राखण्यास करता येणार आहे. तसेच, अवैध धंदे व गुन्हेगारांवर कडक नजर ठेवणार असून अशा प्रवृत्तीला ठेचून काढणार असा सज्जड इशारा पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला.

जिल्ह्याचा पोलिस अधिक्षक पदाचा पदभार घेतल्यानंतर ते शनिवारी (ता. 11) दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्यात 1996 ते 2003 या काळात उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून देगलूर उपविभागात काम केलेले आहे. बऱ्यापैकी जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राचा अभ्यास आहे. जिल्हा क्षेत्रफळाने मोठा असल्याने तितकेच जोखमीचे काम आहे. परंतु, पोलिस हा जनतेचा मित्र म्हणून यापुढे काम करणार आहे. जनता, पत्रकार व पोलिस प्रशासनात समन्वय ठेवण्याचा प्रयत्न करणार. जिल्ह्यातील अवैध धंदे चालु देणार नाही. तसेच गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. कायदा हातात घेणाऱ्यांना कठोरात कठोर शासन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सध्या सुरू असलेल्या धान्य घोटाळ्याचा पर्दाफाश करणार असून या प्रकरणाची माहिती घेत असून तपास अधिकारी म्हणून नुरूल हसन यांची नियुक्ती केली आहे. यात कुठल्याही दबावाला पोलिस प्रशासन बळी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच पोलिस अायुक्त कार्यालयासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे कार्यालय नांदेड येथे झाले पाहिजे मी या मताचा आहे. यावेळी चंद्रकिशोर मीना यांच्या कामाबद्दल त्यांनी कौतूक केले. गणेश चतुर्दशीपर्यंत खात्यांतर्गत कुठलाही बदल करण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आंदोलनात जिल्हाभरात 60 गुन्हे दाखल असून त्यात शेकडो आंदोलकांचा सहभाग आहे. तसेच शहरातील सिसीटीव्ही कॅमेरे पूर्ण सुरू करण्याचा प्रयत्न करणार असे शेवटी त्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे, सहाय्यक पोलिस अधिक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील, पोलिस उपाधिक्षक (मुख्यालय) ए. जी. खान, जनसंपर्क अधिकारी अशोक लाटकर यांची उपस्थिती होती.

Web Title: Police Superintendent Jadhav press conference in nanded