Ashti News : कृषिपंप चोरांशी आष्टी पोलिसांचे संगनमत? कबुली देऊनही प्रकरण रफादफा

पोलीस ठाण्यात बोलवून घेतल्यावर या दोघांनी चोरीची कबुलीही दिली. परंतु पुढे तपासात प्रगती न होता हे प्रकरण जागेवर रफादफा करण्यात आले.
police support thief of agricultural pump theft case ashti villagers allegation
police support thief of agricultural pump theft case ashti villagers allegationEsakal

आष्टी : आष्टी शहरासह तालुक्यात सध्या कृषिपंप चोरांनी धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चो-यांनी शेतकरी वर्ग हैराण झाला असून, या चोरांचा बंदोबस्त करण्याएेवजी त्यांच्याशी पोलिसांचे संगनमत तर नाही ना, असा संशय निर्माण झाला आहे. तालुक्यातील पोखऱी येथील ग्रामस्थांनी दोघांच्या नावासह कृषिपंप चोरीची तकार केली.

पोलीस ठाण्यात बोलवून घेतल्यावर या दोघांनी चोरीची कबुलीही दिली. परंतु पुढे तपासात प्रगती न होता हे प्रकरण जागेवर रफादफा करण्यात आले. ग्रामस्थांनी केलेली तक्रारही गहाळ झाल्याचे पुढे आल्याने या प्रकरणाविषयीचा संशय अधिकच वाढला आहे.

याबाबतची माहिती अशी की, तालुक्यात अनेक ठिकाणी कृषिपंप चोरीच्या घटना सुरू आहेत. पिकांना पाणी देण्याच्या काळात चो-या होत असल्याने शेतक-यांना मोठा मनस्ताप होत आहे. या चो-या रोखण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना होताना दिसत नाहीत.

तसेच चो-यांचा तपास करण्याबाबतही आनंदीआनंद आहे. या पार्श्वभूमीवर आष्टी-जामखेड रस्त्यावरील तालुक्यातील पोखरी ग्रामस्थांना कृषिपंप चोरीच्या प्रकरणात पोलिसांचा अजब अनुभव आल्याने या चोरांशी पोलिसांचे संगनमत तर नाही ना, असा संशय ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

पोखरी गावात कृषिपंप चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वी एका ग्रामस्थाची मोटार काढून घेताना विहिरीत पडली व बुडाली. शेजारील एकाची मोटार चोरीला गेली. त्याने पोलिसांकडे रितसर तक्रार करून त्यात गावातील संशयित दोघा चोरट्यांची नावेही नमूद केली.

पोलिसांनी त्या दोघांना आष्टी पोलीस ठाण्यात बोलावून घेत चौकशी केली असता त्यांनी पोखरीतील चोरीची कबुली दिली. आता आपल्याला गेलेला मुद्देमाल परत मिळेल, तसेच गाव परिसरात यापूर्वी झालेल्या कृषिपंप चो-यांचाही उलगडा होईल,

अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. परंतु पोलिसांनी संबंधित चोरट्यांकडून खिसे गरम करून घेत हे प्रकरण जागेवरच रफादफा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच वरिष्ठांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही ग्रामस्थ करीत आहेत.

कृषिपंप चोरीतील साथीदारांचा शोध घेण्यापूर्वीच प्रकरणावर पडदा

पोखरीतील ग्रामस्थाने गावातील दोघा संशयितांच्या नावासह कृषिपंप चोरीची तक्रार दिल्यावर संबंधितांची चौकशी झाली. त्यांनी कृषिपंप चोरीची कबुली दिली. वास्तविक कृषिपंप चोरी हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. त्यासाठी किमान पाच-सहाजण लागतात. त्यामुळे या दोघांकडे सखोल चौकशी केली असती तर त्यांच्या साथीदारांची नावे निष्पन्न होऊ शकली असती.

परंतु पोलिसांनी चोरटे सापडूनही फिर्याद दाखल केली नाही. ग्रामस्थाने नावासह दिलेली तक्रारही गहाळ झाल्याचे सांगण्यात येत असल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. वरिष्ठाांनी या प्रकरणाची चौकशी करून चोरट्यांचा छडा लावण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

मी सुटीवर असल्याने याबाबत कल्पना नाही, असा काही प्रकार असल्यास शेतकऱ्यांनी तक्रारी कराव्यात, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल

- संतोष खेतमाळस पोलिस निरीक्षक आष्टी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com