‘योगायोग’ जुळाल्याने पोलिस अधिक्षकांनी केली कारवाई

मंगेश शेवाळकर 
शुक्रवार, 21 जून 2019

हिंगोली : जागतिक योग दिनाचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या पोलिस अधिक्षकांनी नांदेड नाका भागात शुक्रवारी (ता. 21) सकाळी नऊ वाजता रेती वाहतुक करणारे टिप्पर पकडून हिंगोली शहर पोलिसांच्या हवाली केले. पोलिस अधिक्षकांचे वाहन अन टिप्पर यांचा योगायोग जुळून आल्याने हि कारवाई झाली आहे.

हिंगोली : जागतिक योग दिनाचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या पोलिस अधिक्षकांनी नांदेड नाका भागात शुक्रवारी (ता. 21) सकाळी नऊ वाजता रेती वाहतुक करणारे टिप्पर पकडून हिंगोली शहर पोलिसांच्या हवाली केले. पोलिस अधिक्षकांचे वाहन अन टिप्पर यांचा योगायोग जुळून आल्याने हि कारवाई झाली आहे.

औंढा नागनाथ व वसमत तालुक्यातील पूर्णा नदीच्या रेतीघाटातून बेकायदेशीरित्या रेती उपसा करून वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे वाहने पकडली जाऊ नये याची पुरेपुर खबरदारी घेतली जात आहे. रात्री उशीरा रेती उपसा करून सकाळी दहा वाजण्याच्या आत वाहनांद्वारे वाहतूक केली जात आहे. सकाळी दहा  वाजेपर्यंत अधिकारी कार्यालयात येत नसल्याचा रेती वाहतूकदार गैरफायदा घेऊ लागले होते. मागील काही दिवसांपासून पोलिसांनीही बेकायदेशीर रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर थेट गुन्हे दाखल करण्याची मोहिमच सुरु केली आहे.  

दरम्यान, आज जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाचे नांदेडनाका भागातील एनटीसी परिसरात आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडेपाच वाजता सर्वच अधिकारी व कर्मचारी एनटीसी मैदानावर आले होते. त्यानंतर साडेआठ वाजता योगाचा कार्यक्रम संपल्यानंतर सुमारे नऊ वाजता पोलिस अधिक्षक योगेशकुमार निवासस्थानाकडे निघाले. याचवेळी नांदेड नाका भागातून रेती वाहतूक करणारे टिप्पर जातांना दिसले. सदर टिप्पर थांबवून त्यांनी थेट शहर पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या हवाली केले. 

दरम्यान, पोलिस अधिक्षकांच्या सकाळी योगाच्या कार्यक्रमामुळे जुळून आलेल्या या ‘योगायोगाने’ टिप्पर चालकाची बोलतीच बंद झाली. त्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक घोरबांड यांनी चौकशी सुरु केली असून त्यामधे कुठल्या रेती घाटातून रेती आणली, रॉयल्टी भरल्याची पावती, घाटाचा लिलाव कधी झाला याची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police takes action on illegal soil trucks