सुरेश राठोड गोळीबार प्रकरणी दोघांना अटक 

सुरेश राठोड गोळीबार प्रकरणी दोघांना अटक 

नांदेड : येथील 'तांडा' बारचे मालक सुरेश राठोड यांच्यावर जुन्या वादातून गोळी झाडून प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी दोघांना अटक केली. मारेकरी हे अट्टल गुन्हेगार असून यापूर्वी त्यांच्यावर मोक्का, खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, पिस्तुल वापरणे यासह आदी गंभीर गुन्हे पोलिस दप्तरी दाखल आहेत.

तांडा बारचे मालक सुरेश राठोड हे गुरूवारी रात्री आपली दुचाकी ( एमएच26-एव्ही- 2007) वरून रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या हॉटेलवर जात होते. त्यांच्यावर रात्री एकच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. यात सुरेश राठोड हे गंभीर जखमी झाले. त्यांनीही तत्परता दाखवत आपल्या जवळ असलेल्या पिस्तुलातून मारेकऱ्यांवर फायर केला. मात्र त्यांचा निशाना चुकला. यानंतर एकच खळबळ उडाली. त्यांच्यावर ग्लोबल हॉस्पीटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 

पोलिस अधिक्षक संजय जाधव, अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या आदेशावरून पोलिस उपाधिक्षक (शहर) अभिजीत फस्के, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे आणि शिवाजीनगर ठाण्याचे मच्छींद्र सुरवसे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविले. स्थागुशाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे आणि पांजूरंग भारती यांच्या पथकांनी अट्टल व सराईत असलेल्या दिलीपसिंग हरिसींग पवार (वय 25) रा. नाथनगर आणि गोपी उर्फ गुरमीतसिंग जोगींद्रसिंग कुल्फीवाले (वय 29) रा. नगिना घाट या दोघांना अटक केली. दोघांनाही शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्याविरूध्द संगनमताने प्राणघातक हल्ला आणि आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील लहाने हे करीत आहेत.

कोण आहेत आरोपी..?

अटक करण्यात आलेल्या दिलीपसिंग पवार याच्याकडून मागील वर्षी 62 जीवंत काडतुस व दोन पिस्तुल पोलिसांनी जप्त केले होते. तसेच गोपी उर्फ गुरमीतसिंग यांच्याकडून पिस्तुल व सहा जीवंत काडतूस, तलावार आणि खंजर असे घातक हत्यार जप्त केले होते. नांदेड पोलिस दलाच्या दप्तरी या दोन्ही आरोपींच्या नावे खून, मोक्का, खूनाचा प्रयत्न, खंडणी, धमकी देणे यासह आदी गंभीर गुन्हे दाखल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com