
ही घटना मंगळवारी ( ता. आठ) येळंब घाटजवळील ढाने दादा मंगल कार्यालयाजवळ घडली.
नेकनूर (बीड) : केज येथे कर्तव्यास असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला बीड-केज रोडवरील येळंब घाट शिवारात अडवून एक लाख रुपयाची मागणी करत बेदम मारहाण करणाऱ्या चार गुंड प्रवृत्तीच्या आरोपींना पत्रकारांच्या व स्थानिकांच्या मदतीने अटक करून बेड्या घालण्यात पोलिसांना यश आले व त्यांच्याकडून धारदार शस्त्र व दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. ही घटना मंगळवारी ( ता. आठ) येळंब घाटजवळील ढाने दादा मंगल कार्यालयाजवळ घडली.
सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी केज येथे कर्तव्यास असणारे पोलिस कर्मचारी समाधान खराडे हे आपल्या चार चाकी वाहनांमधून केजहुन बीडकडे जात असताना त्यांना येळम घाट शिवारातील ढाने दादा मंगल कार्यालयाच्या जवळील पुलावर दोन मोटारसायकलवर आलेल्या चार गुंड प्रवृत्तीच्या आरोपीने धारधार शस्त्रांचा धाक दाखवत एक लाख रुपयांची मागणी केली व त्यांना जबर मारहाण केली.
ही मारहाण चालू असताना रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांनी पाहिल्यानंतर त्यांनी भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या चारही आरोपीनी हातामधील शस्त्र दाखवून त्या लोकांना धमक्या दिल्याने कोणीच काही करू शकले नाही. परंतु हीच माहिती कोणीतरी नेकनूर पोलिसांना दिल्यानंतर नेकनुर पोलिस कर्मचारी त्या ठिकाणी दाखल होताच तीन आरोपींना पकडण्यात यश आले.
परंतु चौथा पळून जात असताना स्थानिकांनी त्या आरोपीलाही पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. परंतु या गोष्टीमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. कारण काही दिवसांपूर्वी त्या परिसरातच एका मुलीलाही जाळण्यात आलेली घटना ताजी असतानाच एका पोलिस कर्मचाऱ्यालाही त्या परिसरातच मारहाण झाल्याने सर्वसामान्य लोकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेमधील चारही आरोपींना अटक केली असून त्यामध्ये महमद इम्रान महमद अब्दुल लतिफ (रा. औरंगाबाद) , महमद फैसल अहमद (रा.औरंगाबाद) , शेख अहमद शेख मकबूल (रा. गुलबर्गा) (कर्नाटक) महमद सद्दाम महमद गौस रा. गुलबर्गा (कर्नाटक) त्यांच्याकडील दोन मोटर सायकल बुलेट (केए 32 आयएफ 307 ) व (केए 32 आयएफ 10) असून त्यांचे धारदार शस्त्र आणि गांजा आणि चिलम हे सर्व साहित्य नेकनूर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक काळे हे करत आहेत.
संपादन - सुस्मिता वडतिले