राष्ट्रवादीत स्पेस शिवसेनेला स्कोप

दत्ता देशमुख
रविवार, 26 मे 2019

लोकसभेचा निकाल आणि क्षीरसागरांच्या शिवसेना प्रवेशामुळे बीड जिल्ह्यात नवे समिकरण
 

बीड : सर्वच पक्षांना काही काही प्रमुख नेत्यांना मानणारा एक वर्ग जिल्ह्यात आहे. पण, भाजप आणि राष्ट्रवादीचा वारु उधळल्याने त्यांचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसच झाकोळली गेली होती. मात्र, लोकसभेच निकाल आणि जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेना प्रवेश यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील राजकारण नव्या वळणावर जाणार हे निश्चित. राष्ट्रवादीत नेतृत्वाचा स्पेस आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तर, क्षीरसागरांसारखा मास लिडर भेटल्याने शिवसेना वाढीला स्कोप निर्माण झाला आहे.

ऐकेकाळी जिल्ह्यावर हुकूमत गाजविणाऱ्या काँग्रेसच्या ताकदीला राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर मर्यादा आल्या. शरद पवार यांना माणणारा मोठा वर्ग असल्याने राष्ट्रवादीचा वारु जिल्हाभर उधळू लागला. पक्षाने विधानसभा, एकदा लोकसभा आणि इतर निवडणुकांत आपल्या ताकदीचे चमत्कार दाखवून दिले. पक्षात मातब्बर नेत्यांचीही वानवा नव्हती. मात्र, पक्षात जिल्ह्याचे नेतृत्व करावे असा नेता पक्षाला स्थापनेपासून सापडला नाही. मात्र, प्रत्येकाला मतदार संघाच्या मर्यादा आखून देऊन त्यांचे नियंत्रण पक्षपातळीवरुन होई. पण, 2012 नंतर पक्षात नवे नेते आले आणि जुन्यांनी बाहेरचा रस्ता धरावा असे प्रयत्न होत गेले. त्यामागे कारणही तसेच आहे.

पक्षाचे व्हायचे ते होईल पण आपल्या सोयीचा, मर्जीचा आणि त्यापेक्षा कानाखालची मंडळी पक्षात राहीली पाहीजे असे धोरण पक्षाने कारभार दिलेल्या मंडळींनी आखले. त्यातून राधाकृष्ण होके पाटील, बदामराव पंडित, सुरेश धस, रमेश आडसकर अशा जनमाणसांत ताकद असलेल्या नेत्यांनी बाहेरचा रस्ता धरला. पक्षांतर्गत भांडणांना आपणच पाठबळ द्यायचे, एखाद्याला डिस्टर्ब करायचे आणि पक्ष सोडण्यास भाग पाडायचे अशी रणनिती मागच्या काही वर्षांत दिसत आहे. सध्या पक्षात धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, नंदकिशोर मुंदडा, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे अशी अनेक कमी - अधिक ताकदीची मंडळी आहेत. मतदार संघात विरोधकांना आव्हान देण्यांची ताकद या मंडळींत पुरेपुर आहे. पण, जिल्ह्याचे नेतृत्व करावे, पक्षाची ताकद वाढवावी, पक्षाला नवा घटक जोडून देणे तर दुरच पण पक्षापासून तुटत चाललेला ओबीसी घटक पक्षासोबत जोडून रहावा, राजकीय चमत्कार घडवावा असा अभाव असल्याचे वारंवारच्या निकालांतून दिसते.

सुरेश धस म्हणतात, तसे भाषण करुन टाळ्या मिळू शकतात पण मत मिळविण्याचे काय ही टिकेची पक्षाने दखल घेण्याची गरज आहे.  वक्तृत्व आणि राजकीय नेतृत्व ह्या दोन गोष्टी वेगळ्या असल्याचे मागच्या पाच वर्षांत झालेल्या निवडणुकांच्या निकालांवरुन दिसते. त्याचीच परिणीणी कालच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दिसली. 

त्यामुळे राष्ट्रवादीत होत असलेला स्पेस भरुन काढण्यास आता शिवसेनेला स्कोप निर्माण झाला आहे. तशी, शिवसेनेच्या डरकाळीची आरोळी एकेकाळी जिल्ह्यात होती. युतीतला मोठा भाऊ मानली जाणारी शिवसेना जिल्ह्यातही मोठा भाऊच होती. तेव्हा सात पैकी चार जागा शिवसेनेला आणि तीन भाजपला होत्या. पक्षाला मानणारा मोठा वर्ग असला तरी सुरुवातीपासून शिवसेनेला मास लिडर भेटला नाही. त्यामुळे आमदारासह काही निवडणुकांत पक्षाने यश मिळविले असले तरी विविध क्षेत्रांत विभागलेल्या ताकदीचा चमत्कार फारसा दिसला नाही. पण, राष्ट्रवादीतूनच बाहेर पडलेल्या बदामराव पंडित यांनी चार जिल्हा परिषदेच्या जागांसह पंचायत समिती ताब्यात घेतली. आता तर जयदत्त क्षीरसागर यांच्यासारखा मास लिडर पक्षाला मिळाला आहे. त्यांच्या विरोधकांचा त्यांच्या राजकीय ताकद आणि भूमिकेबद्दल अक्षेप असला तरी त्यांचे कार्यकर्ते आणि मानणारा वर्ग जिल्हाभरात आहे हे दुर्लक्षूण चालणार नाही. त्यांना शिवसेनेची संस्कृती स्विकारावी लागेल, शिवसेनेत गेल्यामुळे त्यांना मानणारा एक प्रमुख घटक दुरावणार आहे तसेच काही कट्टर शिवसैनिक त्यांचे नेतृत्व मानणारही नाही. त्याची बेगमी इतर मतांत त्यांना करावी लागेल. पण, याच वेळी शिवसेनेच्या जातविरहीत राजकारणाला मानणारा घटक त्यांची जमेची बाजू ठरेल.

भारतभूषण क्षीरसागर यांच्यामुळे बीडसारखी मोठी नगर पालिका, शिक्षण संस्थांचे जाळे आणि जिल्हाभर कर्मचाऱ्यांची कमी - अधिक फळी असा नेताही पक्षाला पहिल्यांदाच भेटला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी तयार करुन देत असलेला स्पेस भरुन काढण्यास शिवसेनेला पुन्हा एकदा स्कोप भेटला आहे. पंकजा मुंडेंचा क्षीरसागरांना असलेला फ्री हॅन्डचाही मोठा उपयोग होणार आहे. त्यातच आगामी काळात क्षीरसागरांना मंत्रीपद भेटण्याची शक्यता असल्याने पक्षविस्तारालाही मोठा फायदा होणार आहे. जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी आपल्या कार्यक्षेत्रात पक्षाचे संघटन वाढवून ठेवलेले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political analysis In Beed District by Datta Deshmukh