पैशाच्या जोरावर विजयी होणारांचे दणाणले धाबे!

शेखलाल शेख - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - निवडून आल्यावर आपल्या गटात, गणांत विकासकामे करणे तर सोडाच, पाच वर्षे मतदारांना तोंडही न दाखविणारे आणि पैशाच्या जोरावर सहज विजयी होता येते, या भ्रमात राहणारे सदस्य, इच्छुक आता चांगलेच गोत्यात आले आहेत. काही महिन्यांपासून कोट्यवधी रुपयांची "व्यवस्था' करून ठेवलेल्या इच्छुकांची आता पंचाईत झाली आहे. पाचशे, हजारांच्या नोटा बंद झाल्याने अनेकांची राजकीय गणिते बदलण्याची शक्‍यता आहे.
 

औरंगाबाद - निवडून आल्यावर आपल्या गटात, गणांत विकासकामे करणे तर सोडाच, पाच वर्षे मतदारांना तोंडही न दाखविणारे आणि पैशाच्या जोरावर सहज विजयी होता येते, या भ्रमात राहणारे सदस्य, इच्छुक आता चांगलेच गोत्यात आले आहेत. काही महिन्यांपासून कोट्यवधी रुपयांची "व्यवस्था' करून ठेवलेल्या इच्छुकांची आता पंचाईत झाली आहे. पाचशे, हजारांच्या नोटा बंद झाल्याने अनेकांची राजकीय गणिते बदलण्याची शक्‍यता आहे.
 

विकासकामे करणारे खूश
आता आहे त्याच नोटा कशा बदलून घ्यायच्या याचे अनेकांना जबरदस्त टेन्शन आल्याची चर्चा आहे. त्यामुळे ज्यांनी आपल्या गटात, गणांत काम केले आहे असे सदस्य तसेच सदैव जनसंपर्कात राहणारे, विकासकामे करणारे इच्छुक मात्र जाम खूश आहेत. पाच वर्षे ज्यांनी विकासकामे केली, लोकांच्या हाकेला धावून गेले अशांच्या विजयाच्या आशा चांगल्याच उंचावल्या आहेत. इतरांना कितीही धडपड केली तरी पुढील सहा महिने तरी कोट्यवधी रुपयांच्या नवीन नोटा मिळणे अवघड आहे. वाटायला "शंभर नंबरी' किती पुरणार असे कोडे आता कामे न करणाऱ्या इच्छुकांना पडले आहे.
 

निवडणुकीतील पैशांचे गणित बदलले
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी लाखो, कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात.
जिल्हा परिषदेच्या एका गटात एक डझनपेक्षा जास्त गावे आणि 25 हजारांच्या जवळपास मतदार आहेत. विजयी होण्यासाठी काही जण 50 लाख ते 1 कोटी रुपयांच्या पुढे खर्च करतात. यासाठी काहीजणांनी आतापासून तयारी करून पैशांची व्यवस्था केली होती. मात्र पाचशे, हजारांच्या नोटा बंद होताच निवडणुकीचे गणितच बदलून गेले आहे. आता आपल्याकडील नोटा बदलून घेण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. नातेवाईक, मित्र परिवाराच्या खात्यात जरी रक्कम टाकली तरी दररोज रक्कम काढण्यावर मर्यादा असल्याने, त्याचे रेकॉर्ड ठेवले जात असल्याने इच्छुकांना जॅम टेन्शन आले आहे.
 

पैशांच्या जोरावर उड्या मारणारे झाले थंड
पैशांच्या जोरावर आपल्या गटात, गणांत उड्या मारणारे अनेक इच्छुक थंड झाले आहेत. आपण कामे केली नाहीत; मात्र लाखो कोट्यवधी रुपये वाटून, पार्ट्या देऊन विजयी होता येणे सहज शक्‍य असल्याचे ज्यांनी स्वप्न बघितले होते. आता ते इतर पर्यायांचा विचार करत आहेत. आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी पर्यायी त्यांना काय "गिफ्ट' देता येईल याची चाचपणी सुरू झाली आहे.
 

भेटीगाठीला सुरवात
निवडणुकीत ब्लॅकचा पैसा पांढरा करण्यासाठी सहा महिने ते वर्षाचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. त्यातच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका जानेवारी, फेब्रुवारीत लागण्याची शक्‍यता असल्याने इच्छुकांनी खडबडून जागे होत गावोगावी भेटीगाठीला सुरवात केली आहे.

Web Title: political calculations changes