राष्ट्रवादीची सत्ता जाणार? अमित देशमुखांनी घातलं औशावर लक्ष

जलील पठाण
Wednesday, 6 January 2021

मागील काही दिवसांपासून येथील नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख पालकमंत्री अमित देशमुखांच्या बद्दल टिका टिप्पणी करताना दिसून आले

औसा: नगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशातच औसा पालिकेतील 20 जागांपैकी 15 जागावर काँग्रेसचे उमेदवार जिंकून आले पाहीजेत तसेच त्यासाठी जी काही मदत लागेल ती आम्ही पुरवायला तयार आहोत अशी प्रतिक्रिया पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

स्थानिक नेत्यांनी  या निवडणुकीत कोणाला सोबत घ्यायचे याचे नियोजन करुन या निवडणुकीला सामोरे जावे. औसा हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि औसाच्या कॉंग्रेसला बळ देणं हे आमचे कर्तव्य आहे. कै. विलासराव देशमुखांपासुन चालत आलेला हा लातुर-औशाचा वारसा या पुढेही आम्ही जपू. इतर पक्षातील प्रवेश आणि कॉंग्रेस पक्षात होत असलेले प्रवेश पाहता महाराष्ट्रात आणि विशेषतः लातूर जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि कॉंग्रेसचेच वारे वाहत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी (ता.4) लातुर येथे केले.

पती हर्षवर्धनविरोधात संजना जाधव निवडणुकीच्या रणांगणात, मुलाचे आईविरुद्ध पॅनल

पालकमंत्री देशमुख यांच्या उपस्थितीत औसातील जवळपास शंभर लोकांनी कॉंग्रेसपक्षात प्रवेश केला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. जवळ आलेली पालिकेची निवडणूक आणि त्यांनी यावर केलेले भाष्य हे आगामी  पालिकेच्या निवडणुकीसाठी सुचक असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्या पासून श्रीशैल उटगे यांनी कॉंग्रेस पक्षात नवीन भरती सुरु केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी औसातील शंभर लोक त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री अमित देशमुखांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात सामील झाले. त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करतांना ना. आमित देशमुख यांनी औशाचा मुद्दा धरत औसा नगरपालिकेवर कॉंग्रेसचे वर्चस्व ठेवण्याची सुचना केली.

औरंगाबाद रेल्वेस्थानकाला पोलिस संरक्षण, नामांतरासाठी मनसेकडून आंदोलनाची शक्यता

मागील काही दिवसांपासून येथील नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख पालकमंत्री अमित देशमुखांच्या बद्दल टिका टिप्पणी करताना दिसून आले. हद्दवाढीच्या बॅनरवरही पालकमंत्री यांना स्थान देण्यात आले नाही. यावरुन आघाडीचे दोन घटक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बेबनाव असल्याचेच दिसून येत आहे. आगामी पालिकेची निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन येथील बहुतांश मुस्लिम समाजातील लोकांना कॉंग्रेस प्रवेश देत नगराध्यक्ष अफसर शेख यांची राजकीय वाट बिकट करण्याचा प्रयत्न होत आहे.

15 जागा येण्यासाठी वाट्टेल ती मदत आणि ताकत देण्याची पालकमंत्र्याची भाषाच औसातील राजकीय भुकंपाची चाहुल देत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत वंचितकडून निवडणूक लढविलेले सुधीर पोतदार यांनीही त्यांच्या कार्यकर्त्यांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political news Amit Deshmukh Ausa ncp congress latur