Gram Panchayat Election: तिरंगी लढतीत सत्तेच्या चाव्या कुणाला मिळणार?

अविनाश काळे
Friday, 8 January 2021

कराळी, रामपूर येथे तिरंगी लढती ;  हिप्परगाराव, नागराळमध्ये फक्त एका जागेसाठी निवडणूक

उमरगा: गत पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणूकीत बिनविरोध आलेल्या बोरी, रामपूर, कराळी, दाबका, हंद्राळ व सुपतगांव या गावात यंदा चुरशीची लढत होत आहे. विशेषत: रामपूर, कराळीत तिरंगी लढत होत असून सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर २२ जानेवारीला होणार आहे. दरम्यान तिरंगी लढतील तिरंगा राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा बहुमान कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गावपातळीवरील अंतर्गत राजकारणामुळे चूरस निर्माण झाली आणि सरपंचपदाच्या खूर्चीसाठी सर्वांचीच इच्छाशक्ती प्रकट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील ४९ पैकी अकरा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत. गत पंचवार्षिक निवडणूकीत बिनविरोध झालेल्या कराळी, रामपूर, हंद्राळ व बोरी गावच्या निवडणूकीत उमेदवार नशीब अजमावत आहेत.

ईमेल हॅक करून लाखोंचा गंडा, वाळूजमधील वर्षा फोर्जिंग कंपनीची फसवणूक

कराळीत सात जागेसाठी तीन आघाड्यातून २९ उमेदवार निवडणूकीत उतरले आहेत. लॉकडाऊनमुळे गावकडच्या वातावरणात रममान झालेले आणि विविध सामाजिक उपक्रमाने स्वतःची ओळख निर्माण केलेल्या पूणेकर तरूणाची एक आघाडी आहे तर शिवसेनेसह अन्य पक्षाचे दोन आघाड्या आहेत. रामपूरकर बिनविरोधच्या परंपरेला फाटा देत स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी निवडणूक फडात आठ जागेसाठी २३ उमेदवार उतरले आहेत.

एक जागा बिनविरोध आली आहे. कदेरमध्ये अकरा जागेसाठी २५ उमेदवार आहेत. गुंजोटीत सतरा जागेसाठी पन्नास उमेदवार आहेत. शिवसेनेचे स्वतंत्र पॅनेल,  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत तर माजी सैनिक व भाजपचे एक पॅनेल आहे. तुरोरीत अडीच पॅनेल आहेत. जवळपास ३० गावात दुरंगी लढतीचे चित्र असून प्रत्येकजण प्रचारात दंग आहे.

शहरांची नावं बदलून लोकांच्या आयुष्यात काय बदल झाले? - बाळासाहेब थोरात

हिप्परगाराव, नागराळमध्ये फक्त एका जागेसाठी निवडणूक-
बिनविरोध साठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणाऱ्या हिप्परगाराव, नागराळमध्ये फक्त एका जागेसाठी निवडणूक होत आहे. हिप्परगाराव येथे एकूण नऊ जागा आहे, त्यातील सात जागा बिनविरोध काढण्यात आल्या. अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी उमेदवार मिळू शकला नाही. सध्या एका जागेसाठी चुलते - पुतण्यात लढत होत आहे. नागराळच्या सातपैकी सहा जागा बिनविरोध काढण्यात आल्या मात्र एका जागेसाठी निवडणूक लागली आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political news gram panchayat election umarga usmanabad