मिनी मंत्रालयातील ‘सत्तेचे पत्ते’ झाकलेलेच

- शेखलाल शेख
गुरुवार, 9 मार्च 2017

भाजप म्हणतो आमच्या बाजूने अडचण नाही; अद्यापही भाजपला शिवसेनेच्या टाळीची प्रतीक्षा

औरंगाबाद - जिल्हा परिषदेत अद्यापही सत्ता स्थापनेसाठी पेच कायम आहे. भाजप चर्चेसाठी आमच्या बाजूने काहीच अडचण नसल्याचे म्हणत असला तरी शिवसेना अद्यापही टाळी देण्यास तयार नाही. जोपर्यंत आदेश येत नाहीत तोपर्यंत काहीच सांगता येत नसल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. 

भाजप म्हणतो आमच्या बाजूने अडचण नाही; अद्यापही भाजपला शिवसेनेच्या टाळीची प्रतीक्षा

औरंगाबाद - जिल्हा परिषदेत अद्यापही सत्ता स्थापनेसाठी पेच कायम आहे. भाजप चर्चेसाठी आमच्या बाजूने काहीच अडचण नसल्याचे म्हणत असला तरी शिवसेना अद्यापही टाळी देण्यास तयार नाही. जोपर्यंत आदेश येत नाहीत तोपर्यंत काहीच सांगता येत नसल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. 

निवडणुकीत औरंगाबादच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेला धोबीपछाड देत भाजप सध्या मोठा भाऊ झाला आहे. आता मुंबईत भाजप नगरसेवकांनी शिवसेनेला बिनशर्त पाठींबा दिल्याने औरंगाबादेत सुद्धा सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेने भाजपला पाठींबा द्यावा, याकरिता भाजप नेते प्रयत्नशील आहेत. मात्र शिवसेना नेत्यांची हाताची घडी आणि तोंडावर बोटच्या या स्थितीने भाजप नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. 

जिल्हा परिषदेत भाजपचे एका पुरस्कृत सदस्यासह २३, शिवसेना १८, काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस ३, मनसे १, रिपाइं (डी) १ एक, असे ६२ सदस्य आहेत. सभागृहात मॅजिक फिगरसाठी ३२ सदस्यांची आवश्‍यकता आहे. यामध्ये शिवसेना, भाजप एकत्र आले तर दोघांची सदस्य संख्या ही ४१ होते.

शिवसेना, भाजप एकत्र आले तर दोन्ही पक्ष अडीच अडीच वर्षांकरिता अध्यक्षपद वाटून घेऊ शकतात. चार सभापतींपैकी दोन-दोन सभापती त्यांच्या वाट्यास येऊ शकतात. किंवा सुरवातीचा किती काळ अध्यक्षपद द्यायचे आणि शेवटच्या दोन वर्षांतील सत्तेचा फॉर्म्युला ठरविला जाऊ शकतो. यावर आता येत्या बैठकीत भाजप नेते चर्चा करून शिवसेनेस चर्चेसाठी टाळी देऊ शकतात. 

पंचायत समितीमध्ये २० सदस्य असले तरी कुणाकडेही बहुमत नाही. काँग्रेसकडे ८ सदस्य असून त्यांनी दोन्ही अपक्षांना सोबत घेतले तरीही त्यांना एक जागा कमी पडते. पंचायत समितीत भाजप ७ तर शिवसेनेचे ३ सदस्य आहेत. दोन्ही पक्ष एकत्र आले तर दोघांना सत्तेच्या जवळ जाता येणार आहे, मात्र येथेही दोघांना दोन अपक्षांपैकी एकास सोबत घ्यावे लागणार आहे.

जिल्हा परिषदेतील बलाबल
पक्ष    बलाबल

भाजप    २२
शिवसेना    १८
काँग्रेस    १६
राष्ट्रवादी काँग्रेस    ०३
मनसे    ०१
रिपाइं (डी)    ०१
अपक्ष (भाजप पुरस्कृत)    ०१
 

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सत्ता स्थापनेच्या चर्चेकरिता आमच्या बाजूने कोणतीही अडचण नाही. आमची चर्चेची तयारी आहे. येत्या दोन-तीन दिवसांत बैठकीविषयी बघू.
- एकनाथ जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये कुणासोबत जायचे, याविषयी आम्हाला कोणत्याही प्रकारचे आदेश मिळालेले नाही. अद्याप कोणत्याही चर्चेचा प्रश्‍नच नाही. पक्षाचा आदेश मिळेल, त्यानुसार पुढील दिशा ठरेल. 
- अंबादास दानवे (जिल्हाप्रमुख, शिवसेना)

Web Title: politics mini ministry