मुंडेंनंतर झेडपीच्या डावपेचात धस, आडसकर ठरले माहीर

दत्ता देशमुख
रविवार, 18 डिसेंबर 2016

१५ वर्षांत दोघांचेही डाव ठरले यशस्वी, कधी विरोधक, तर कधी स्वकीयांनाही केले घायाळ

बीड - स्वत:च्या इशाऱ्यावर अनेक वर्षे जिल्हा परिषदेची सत्ता चालविणाऱ्या दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर राजकीय डावपेच टाकण्यात माजी मंत्री सुरेश धस आणि रमेश आडसकर हे दोघेच माहीर ठरले. दोघांनीही डावपेचात कधी विरोधकांना, तर कधी स्वकीयांनाही घायाळ केले. धसांचा एक डाव मुंडेंनाही भारी पडला होता. मागच्या पंधरा वर्षांत बहुतांशी काळ या दोघांनी टाकलेल्या डावांभोवतीच जिल्हा परिषदेची सत्ता राहिली.  

१५ वर्षांत दोघांचेही डाव ठरले यशस्वी, कधी विरोधक, तर कधी स्वकीयांनाही केले घायाळ

बीड - स्वत:च्या इशाऱ्यावर अनेक वर्षे जिल्हा परिषदेची सत्ता चालविणाऱ्या दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर राजकीय डावपेच टाकण्यात माजी मंत्री सुरेश धस आणि रमेश आडसकर हे दोघेच माहीर ठरले. दोघांनीही डावपेचात कधी विरोधकांना, तर कधी स्वकीयांनाही घायाळ केले. धसांचा एक डाव मुंडेंनाही भारी पडला होता. मागच्या पंधरा वर्षांत बहुतांशी काळ या दोघांनी टाकलेल्या डावांभोवतीच जिल्हा परिषदेची सत्ता राहिली.  

२००२ पर्यंत जिल्हा परिषदेच्या सत्तेची चावी कायम दिवंगत मुंडे यांच्याकडे असे. याच वेळी २००२ मध्ये इतर तीन समर्थकांसह जिल्हा परिषदेच्या प्रथम पायऱ्या चढणाऱ्या रमेश आडसकरांनी तत्कालीन अध्यक्ष (कै.) पंडित अण्णा मुंडे यांच्यासोबत उपाध्यक्षपद मिळविले; पण पुढच्या अडीच वर्षांनी झालेल्या निवडीत माजी मंत्री सुरेश धस यांनी टाकलेला राजकीय डाव दिवंगत मुंडे यांनाही भारी पडला होता. जिल्हा परिषदेत सत्तांतर घडवत समर्थक डॉ. शिवाजी राऊत यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पाडून घेतली. या सत्तांतराची राज्यभर चर्चा तर झालीच शिवाय या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या खुर्चित राष्ट्रवादीला बसण्याची प्रथमच संधी भेटली; मात्र या वेळीही उपाध्यक्षपदाची माळ रमेश आडसकरांच्याच गळ्यात कायम राहिली. तर, २००७ मधील निवडणुकीत भाजपकडे सत्ता गेली व मीरा गांधले अध्यक्षा, तर धनंजय मुंडे उपाध्यक्ष झाले; मात्र, पुढच्याच अडीच वर्षांनी रमेश आडसकर यांनी राजकीय डाव टाकत राष्ट्रवादीकडे सत्ता आणली. पक्षाकडून त्यांच्या समर्थक शोभा पिंगळे यांना उमेदवारी मिळवून अध्यक्षपदी बसवले. या वेळी एका पक्षाकडे अध्यक्षपद आणि दुसऱ्याकडे उपाध्यक्षपद हीच आडसकरांची मोठी खेळी ठरली. दरम्यान, २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार अमरसिंह पंडित यांच्या स्वाभिमानी आघाडीच्या साथीने राष्ट्रवादी सत्तेच्या उंबरठ्यावर आली. या वेळी मातब्बरांची नावे आघाडीवर असताना स्वत:चे समर्थक सय्यद अब्दुल्ला यांना आश्‍चर्यकारक आणि शेवटच्या क्षणी अध्यक्षपदाची उमेदवारी मिळविण्याची सुरेश धस यांच्या खेळीने स्वकियांनाच घायाळ केले. 
यावेळीही सत्तेत वाटा राखण्यात आडसकरांना यश आले व त्यांच्या पत्नी अर्चना आडसकर उपाध्यक्ष झाल्या. या काळात जिल्हा परिषदेत कधी सत्तेत नसतानाही विकासकामांत वाटा मिळविण्यातही आडसकरांचा हातखंडा राहिला. पक्षातल्यांबरोबर विरोधकांशीही संवाद ठेवण्याचे आणि राजकीय गणित जुळवण्याचे त्यांचे कसब लक्षणीय राहिले. तर यावेळीही पक्षातीलच विरोधकांवर डाव टाकत समाज कल्याणचा सर्वाधिक निधी मिळविण्याची सुरेश धसांची खेळी यशस्वी झाली. एकूणच राष्ट्रवादीकडे सुरेश धस व भाजपकडे रमेश आडसकर हे जिल्हा परिषदेतल्या डावपेचातले हुकमी एक्के आहेत. होऊ घातलेल्या निवडणुकीत दोघांचेही पक्ष त्यांना किती वाव देतात आणि त्यांच्या खेळ्या किती यशस्वी होतात हे येणारा काळच सांगेल.

शंभर टक्के रिझल्ट
जिल्हा परिषदेच्या गेल्या तीन निवडणुकांत पक्षाला शंभर टक्के रिझल्ट देण्याची किमयाही आडसकरांनी केली. २००२ ते २०१२ या काळात त्यांनी स्वत:सह तीन समर्थकांना पक्षांकडून उमेदवाऱ्या घेतल्या. तीनही वेळी त्यांनी पक्षाला शंभर टक्के रिझल्ट मिळवून दिला. 

अध्यक्षपदासोबत नाराजीही...
सुरवातीला डॉ. शिवाजी राऊत व मागच्या वेळी सय्यद अब्दुल्ला यांना अध्यक्षपद मिळविण्याच्या सुरेश धस यांच्या खेळी यशस्वी ठरल्या आणि राजकीय पटलावर गाजल्याही; पण या अध्यक्षांच्या कारभाराची नाराजी सुरेश धस यांना भोवली. 

Web Title: politics in zp