656
656

परभणी जिल्ह्यात ७८ केंद्रांवर पदवीधरसाठी मतदान 

परभणीः मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी मंगळवारी (ता.एक) मतदान घेतले जाणार आहे. या मतदानात महाविकास आघाडीसह भाजपमध्ये मोठे युध्द रंगणार असल्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ७८ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सोमवारी सकाळपासून प्रशासनातील अधिकारी - कर्मचारी आप - आपल्या मतदान केंद्राचे साहित्य घेवून रवाना झाले होते. 


मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.एक) रोजी जिल्ह्यातील ७८ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यात ३२ हजार ७१५ पदवीधर मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. सकाळी आठपासून मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. सांयकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदान प्रक्रिया योग्यरितीने पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी स्वतः पूर्ण प्रक्रियेवर जातीने लक्ष घातले आहे. सोमवारी (ता.३०) सकाळपासून मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी - कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचे साहित्य वाटप करण्यात आले. सायंकाळी सर्व अधिकारी - कर्मचारी त्यांच्याकडे देण्यात आलेल्या मतदान केंद्रावर पोहचले. 

प्रशासनाने केलेल्या या आहेत सूचना 
मतदान करण्यासाठी केवळ मतपत्रिकेसोबत पुरविलेला जांभळ्या रंगाचा स्केच पेनचाच वापर करावा. याशिवाय इतर कुठलेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईंट पेन यांचा वापर करु नये, ज्या उमेदवारास तुम्ही पहिला पसंतीक्रम देण्यासाठी निवडले आहे. त्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रम (Oredr of Preference) असे नमूद केलेल्या रकान्यात ‘१’ हा अंक नमूद करून मतदान करावे. कोणत्याही उमेदवारांच्या नावासमोर केवळ एकच अंक नमूद करणे गरजेचे आहे. मतपत्रिकेवर स्वाक्षरी किंवा आद्याक्षरे किंवा नाव किंवा कोणतेही शब्द नमूद करु नये. 

हे ओळखपत्र सादर करता येऊ शकता 
आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, पारपत्र, केंद्र,राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम,स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदवीधर, शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर, शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे वितरित पदवी, पदवीका मुळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे मुळ प्रमाणपत्र सादर करता येतील. 

पोलिसांचा विशेष बंदोबस्त 
पदवीधर निवडणुकीची मतदान प्रक्रिया मंगळवारी होणार असल्याने दिवसभर शहरातील व जिल्हयातील मतदान केंद्रावर तसेच सार्वजनिक ठिकाणी पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे. स्वतः पोलिस अधिक्षक जयंतकुमार मीना हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत. 

गंगाखेड तालुक्यात सात मतदान केंद्र, तीन हजार ६८९ मतदार 
गंगाखेड ः मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी लागणारे कर्मचारी, पोलिस कर्मचारी मतदान केंद्र आदी संदर्भात तालुका प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज आहे. गंगाखेड तालुक्यात स्त्री मतदार ६६९ व पुरुष मतदार ३०२० असे एकूण तीन हजार ६८९ मतदार असून गंगाखेड शहरात तीन मतदान केंद्रापैकी तहसील कार्यालयात दोन व पंचायत समिती सभाग्रहात एक मतदान केंद्र आहे, महातपुरी एक, माखणी एक, पिंपळदरी एक, राणीसावरगाव एक असे एकूण गंगाखेड तालुक्यात सात मतदान केंद्र आहेत. तालुक्यातील सात मतदान केंद्रावर दोन ऑफिसर व २८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रावर पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले. तालुक्यातील मतदान केंद्राच्या दोनशे मीटर मीटरच्या आत पेंडॉल टाकता येणार नाही. तसेच मतदान केंद्राच्या परिसरात गर्दी करू नये. नोंदणी केलेल्या मतदारांनी नोंदणीचा हक्क बजवावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी केले.  


तालुका मतदान केंद्र मतदार संख्या 
परभणी  २४  १३ हजार ४८३ 
पालम   सहा   एक हजार ६९७ 
पूर्णा     सात    दोन हजार ५५९ 
गंगाखेड सात  तीन हजार ६८९ 
सोनपेठ  चार   एक हजार ३३० 
सेलू     आठ  दोन हजार७७८ 
पाथरी   सहा   दोन हजार ४८ 
जिंतूर    दहा   तीन हजार ४२२ 
मानवत सहा  एक हजार ७०९ 

 
संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com