वडिलांच्या मृतदेहाशेजारी बसून अभ्यास करणाऱया पुजाचे परिक्षेत यश

pooja hanwate
pooja hanwate

हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्‍यातील भोसी येथे वडिलांच्‍या मृतदेहाशेजारी बसून अभ्यास करणाऱ्या पूजा चंपती हनवते हिने दहावी परीक्षेत ४६ टक्‍के गुण मिळविले आहे. मैत्रिणीने दूरध्वनीवरून निकालाची माहिती दिल्‍यानंतर एकीकडे आनंदाश्रू तर दुसरीकडे वडिलाच्‍या आठवणीने तिला गहिवरून आल्‍याचे चित्र होते.

तालुक्‍यातील भोसी येथील चंपती हनवते कुटूंब रोजमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. त्‍यांची मुलगी पूजा हनवते अभ्यासात हुशार असल्‍याने तिला शिक्षण देण्याचा निर्णय श्री. हनवते कुटूंबियांनी घेतला होता. त्‍यासाठी त्‍यांनी पोटाला चिमटा घेवून तिच्‍या शिक्षणाचा खर्च केला. दहावीची परीक्षा जवळ आल्‍याने पूजाने दिवसरात्र एक करून अभ्यास केला. मात्र २८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री तिच्‍या वडिलाचे निधन झाले. त्‍यामुळे आता ता. १ मार्च रोजी परीक्षा देण्याचा प्रश्न निर्माण झाला. मात्र, गावकऱ्यांनी तिची समजूत काढल्‍यानंतर वडिलांचे स्‍वप्‍न पूर्ण करण्यासाठी तिने वडिलांच्‍या मृतदेहाच्‍या बाजूला बसूनच मराठी विषयाचा अभ्यास केला व डिग्रस कऱ्हाळे येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली. परीक्षा झाल्‍यानंतर घरी आल्‍यानंतर मयत चंपती हनवते यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार करण्यात आले होते.

दरम्‍यान, आज दहावीचा निकाल लागल्‍यानंतर वडिलांच्‍या आठवणीने पूजाचे डोळे पाणावले. निकाल पाहण्यासाठी ती गेली नाही. मात्र तिच्‍या मैत्रिणीने निकाल पाहून ४६ टक्‍के गुण मिळाल्‍याचे सांगितले. एकीकडे निकालाचा आनंद तर दुसरीकडे वडिलांच्‍या आठवणीने डोळ्यातून आश्रू वाहू लागले होते. मराठी विषयात तिला ४७ गुण मिळाले आहेत. तिच्‍या यशाने गावकरीही भारावून गेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com