छत्रपती संभाजीराजेंच्या पुतळ्याच्या साक्षीने पूजा-प्रदीप विवाहबंधनात

aurangabad
aurangabad

औरंगाबाद : मंगल कार्यालयातील पुजा आणि प्रदीप यांचा साखरपुडा संपतोय, तोवर लगेचच लग्नाची बोलणी झाली. आश्चर्य म्हणजे तासाभरात लग्नही झाले. तेही थेट टीव्ही सेंटर येथील स्वराज्यरक्षक संभाजीराजे यांच्या पुतळ्यास साक्षी ठेवून. सोमवारी (ता. 28) दुपारी एकच्या सुमारास घडलेल्या या अनोख्या विवाहाची चर्चा शहरात सुरू झालीय.

शहरातील निर्मल लॉन्समध्ये सिंधी पिंपळगाव (ता. बदनापूर, जि. जालना) येथील शंकरराव शिरसाठ यांचे चिरंजीव प्रदीप आणि सांजूळ (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील नवनाथ जाधव यांची शिवकन्या पुजा यांचा सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास साखरपुडा सुरु होता. कुटुंबीय, पै-पाहूणे, मित्रमंडळी, गावकरी जमले होते. कार्यालयात साखरपुडाही मोठ्या दिमाखात पार पडला. याचवेळी चर्चा सुरु झाली ती, लग्नातील वारेमाप खर्च टाळण्यासाठीची. उपस्थित मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी प्रोत्साहन देत लग्न आजच करण्याचे सुचविले. मुला-मुलीचे आई, वडील, मामा आणि जवळचे नातेवाईक यांच्याशी चर्चा झाली. मुला-मुलीसह साऱ्यांचाच होकार मिळाला.

लग्नस्थळ ठरले ते थेट टीव्ही सेंटर येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजेंचा पुतळा परिसर. कार्यालयासमोरची वाजंत्री रवाना झाली. सनई चौघडे वाजु लागले. लगोलग वधु - वर वऱ्हाडीसह तिथे पोहोचले. थोड्याच वेळात मंगलाष्टका सुरु झाल्या तशी, रस्त्यावरून जाणारी वाहने थबकली. आणि लोकांनी छत्रपती संभाजीराजेंच्या चरणी सुरु असलेला हा विवाह सोहळा आपल्या डोळ्यात साठवला. याप्रसंगी अडीचशेपेक्षा जास्त वऱ्हाडी उपस्थित होते.

लग्न समारंभ पार पडल्यानंतर जेवणासाठी वऱ्हाडी पुन्हा कार्यालयात निघून गेले. लग्नकार्यासाठी मराठा क्रांती मोर्चासह मुलाचे मामा गणपत म्हस्के आणि राजेंद्र पवार यांनी पुढाकार घेतला.

लग्नाचे खर्च टाळण्यासाठी अशा परंपरा सुरू व्हायला पाहिजेत. नुसते बोलून उपयोगाचे नाही. आपण केले तर, लोक अनुकरण करतील. गरज नसताना वारेमाप खर्च टाळा. यातून घराला, देशाला हातभार लागेल.
- नवनाथ जाधव, (वधुपिता)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com