अखेर असहाय व्यक्तीला मिळाले उपचार

Sakal-Impact
Sakal-Impact

औरंगाबाद - मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर गेल्या चार ते पाच दिवसांपासून उपाशी असलेल्या असहाय ज्येष्ठ नागरिकाला अखेर न्याय मिळाला. ‘सकाळ’मध्ये बातमी प्रकाशित होताच एमजीएम संस्थेने दखल घेतली. सोमवारी (ता. २९) सकाळी नऊ वाजता रुग्णवाहिकेमधून त्या व्यक्तीला थेट एमजीएम रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले आहेत. 

प्रचंड उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत असताना गेल्या चार ते पाच दिवसांपासून पोटात अन्नाचा कणही नाही, अशा अवस्थेत मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर एक असहाय ज्येष्ठ नागरिक पडून होता. त्यामुळे रेल्वेचे तिकीट बुकिंग कर्मचारी गोविंद पुंडगे यांनी याची माहिती १०८ रुग्णवाहिका आणि रेल्वे सुरक्षा बलाला दिली; मात्र दोन्ही यंत्रणांनी आणि पोलिसांनीही साधी दखलही घेतली नाही. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मधून प्रकाशित होताच सोमवारी सकाळी साधारण साडेनऊच्या सुमारास एमजीएम रुग्णालयाची ॲम्ब्युलन्स थेट मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर आली. एमजीएमचे विश्‍वस्त अंकुशराव कदम यांनी स्वत:च दखल घेतली. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला थेट रुग्णालयात भरती केले. तिच्या सर्व तपासण्या करून उपचारही सुरू केल्याचे एमजीएमचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी सांगितले. 

आरपीएफ आणि पोलिसांचा नाकर्तेपणा 
मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर असहाय व्यक्ती पडून असल्याची माहिती रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वे सुरक्षा बलाला (आरपीएफ) दिली होती. त्याचप्रमाणे १०८ या ॲम्ब्युलन्सलाही माहिती दिली होती; मात्र १०८ ॲम्ब्युलन्सने कुणी सोबत येणार असेल तरच सोबत येण्याचा हेका धरला होता; तर आरपीएफचे निरीक्षक अरविंद शर्मा यांनी कर्मचाऱ्यांना खात्री करण्यासाठी पाठवले; मात्र कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन ती व्यक्ती असहाय नसून, तिला पत्नी असल्याचे खोटे सांगितले. त्यामुळे आरपीएफने भूमिकाच घेतली नाही. नागरिकांनी मुकुंदवाडी पोलिसांना कळवले होते; मात्र त्यांनीही दखल घेतली नाही. प्रशासकीय स्तरावर संवेदना बोथट झाल्या असल्या तरीही एमजीएमने मात्र माणुसकीचेच दर्शन घडवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com