लातूरातील खासगी शिकवणी चालकांचा रविवारच्या सुट्टीला सकारात्मक प्रतिसाद

विकास गाढवे 
मंगळवार, 10 जुलै 2018

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. 9) घेतलेल्या बैठकी खासगी शिकवणी चालकांनी श्रीकांत यांच्या सर्वांना सुट्टी रविवार या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला.

लातूर - सर्वांना सुट्टी रविवार, रविवार माझ्या आवडीचा, हे रविवारच्या सुट्टीबाबत असलेले बोल लातूर पॅटर्नच्या ओझ्याखाली दबलेल्या शहरातील विद्यार्थ्यांसाठी खरे ठरणार आहेत. येत्या रविवारपासून (ता. 15) त्यांना रविवारच्या सुट्टीचा आनंद मिळणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केलेल्या शिष्टाईला यश आले आहे. या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. 9) घेतलेल्या बैठकी खासगी शिकवणी चालकांनी जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या सर्वांना सुट्टी रविवार या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे अनेक वर्षानंतर लातूरचे विद्यार्थी पहिल्यांदाच रविवारच्या सुट्टीचा आनंद घेणार आहेत.

गुणवत्ता आणि गुणांच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना स्वतःचे छंद जोपासण्यासाठी थोडीही उसंत मिळत नसल्याची स्थिती आहे. शाळा, शिकवणी आणि अभ्यास या साखळी संपता संपत नसल्याने विद्यार्थी त्रस्त होऊन गेले आहे. पाल्याचा हा दिनक्रम पाळतानाही पालकांची दमछाक होत आहे. गुणांच्या स्पर्धेतून आठवड्यातील सर्व दिवस विद्यार्थ्यांसाठी सारखे झाले असून अभ्यासाशिवाय खेळ, मित्रांसोबत गप्पा आदी विषय त्याच्यासाठी पोरके झाले आहेत. विद्यार्थ्यांची ही परवड लक्षात घेता जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सर्वांना सुट्टी रविवार ही संकल्पना पुढे आणली आहे.

या संकल्पनेत विद्यार्थ्यांना रविवारी किमान एक दिवस खरी खुरी सुट्टी मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मुरूड (ता. लातूर) येथील खासगी शिकवणी चालकांनी त्यांच्या या संकल्पनेला दाद दिल्यानंतर सोमवारी त्यांनी शहरातील सर्व खासगी शिकवणी चालकांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून या विषयावर त्यांनी चर्चा केली. शिकवणी चालकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांना रविवारी सुट्टी देण्याच्या विषयावर त्यांचे मत जाणून घेतले. काहींनी पालक विरोध करतील, असा सूर आळवला. अशा पालकांना माझ्याकडे पाठवून द्या, असा सल्लाही श्रीकांत यांनी दिल्यानंतर शिकवणी चालक रविवारच्या सुट्टीवर राजी झाले. यासोबत रात्री साडेनऊनंतर शिकवणी घेऊ नये, अनाधिकृत बॅनरबाजी बंद करावी, कर वेळेवर भरावेत, स्वच्छतागृहाची पुरेशी व्यवस्थ करावी, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आदी सुचना श्रीकांत यांनी दिल्या. यासोबत शिकवणी चालकांच्या खंडणी मागणाऱ्यांचा बंदोबस्त, उद्योग भवन परिसरात कायमस्वरूपी पोलिस चौकी सुरू करावी आदी मागण्यांची दखलही श्रीकांत यांनी घेतली. या वेळी महापालिका आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह शिकवणी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

रविवारी सुट्टी न देता विद्यार्थ्यांचे एकप्रकारणे बालपणच हिरावून घेत असल्याची तसेच स्वतःच्या कुटुंबांना वेळ न देता कौटुंबिक हिंसाचारही करत असल्याची जाणीव जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी करून दिली. शिकवणी चालकांची बाजू आणि समस्या त्यांनी ऐकून घेतल्या. सर्वांना सुट्टी रविवार ही त्यांची संकल्पना सर्वांना आवडली. यामुळे येत्या रविवारपासून आम्ही त्याची अंमलबजावणी करणार असून रविवारी शिकवणी वर्गाला सुट्टी दिली जाणार आहे. - रविशंकर कोरे, सदस्य, प्रायव्हेट टिचर असोसिएशन, लातूर.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Positive feedback of private tutores to Sundays off in Latur