कामानिमित्त गेलेल्या शिवसैनिकाच्या गळ्यात पडला कमळफुलाचा रुमाल

बदनापूर : शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव खंडेकर यांचा गुरुवारी सत्कार करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे आदी. 
बदनापूर : शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव खंडेकर यांचा गुरुवारी सत्कार करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे आदी. 

बदनापूर - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षप्रवेश सोहळ्याला चांगलाच रंग चढला आहे. इतका की, गळ्यात हार टाकून, रुमाल चढवून झाला पक्षप्रवेश असे चित्र आहे. अर्थातच यामुळे गमतीजमतीही घडत आहेत. एका रुग्णाला निधी व उपचारासाठी पत्र मिळावे म्हणून आमदार कार्यालयात गेलेल्या एका शिवसैनिकाची कमळफुलाच्या रुमालाने गुरुवारी (ता. 22) चांगलीच गोची केली. गावभर पक्षप्रवेशाच्या पोस्ट व्हायरल झाल्या. त्यामुळे "आपण अजूनही शिवसेनेत आहोत' हे सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली. 

काजळा (ता. बदनापूर) येथील ज्येष्ठ शिवसैनिक नामदेव खंडेकर हे गुरुवारी (ता. 22) एका रुग्णाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत तसेच उपचाराबाबत पत्र मिळावे म्हणून आमदार नारायण कुचे यांच्या कार्यालयात गेले होते. तेव्हा कार्यालयात भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्‍ती झाल्यानिमित्त आमदार संतोष दानवे यांचा सत्कार सोहळा होता. या सोहळ्यातच पोचलेल्या श्री. खंडेकर यांचा गळ्यात कमळफुलाचा रुमाल आणि हार टाकून सत्कार झाला. त्यातच श्री. खंडेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा फोटो व मजकूर भाजपच्या सोशल मीडियाकडून प्रसारित करण्यात आला. त्यानंतर शिवसैनिकांकडून या प्रवेशावर टीका होऊ लागली. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेशाचे खंडन करीत मी शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता असून शिवसेनेतच राहणार असल्याची स्पष्टोक्ती श्री. खंडेकर यांना द्यावी लागली.

शिवसेनेच्या पंचायत समितीच्या काजळा गणाच्या सदस्या उषा खंडेकर यांचे नामदेव खंडेकर सासरे आहेत. ते अनेक वर्षांपासून शिवसेनेचे कार्यकर्ते मानले जातात. कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश घ्या म्हणत उगाच रुमाल टाकून सत्कार झाल्याचा दावा श्री. खंडेकर यांनी केला. तर  या पक्षप्रवेशाची इच्छा त्यांनीच व्यक्‍त केली होती, असेही म्हटले जात आहे. 

नामदेव खंडेकर यांना कधी भाजपमध्ये प्रवेश घेण्याचे सांगितले नाही. तेच जिल्हाध्यक्ष संतोष दानवे यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते. तेव्हा त्यांनीच भाजपमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे त्यांचे भाजपचा रुमाल गळ्यात टाकून स्वागत करण्यात आले. अर्थात आता त्यांची शिवसेनेतच राहण्याची इच्छा असेल तर हरकत नाही. शेवटी शिवसेना आमचाच मित्रपक्ष आहे. 
- नारायण कुचे, 
आमदार, बदनापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com