ऊर्जामंत्र्यांनी राजीनामा देऊन महावितरणात क्लार्कची नोकरी करावी, प्रवीण दरेकरांनी नितीन राऊतांना लगावला टोला

तानाजी जाधवर
Saturday, 21 November 2020

बेरोजगारांना नोकरी व स्वयंरोजगारासाठी शाश्वत योजना निर्माण करण्याचा मानस भाजपचा असुन या निवडणुकीचा हाच पक्षाचा अजेंडा असल्याचे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यानी व्यक्त केले.

उस्मानाबाद  : बेरोजगारांना नोकरी व स्वयंरोजगारासाठी शाश्वत योजना निर्माण करण्याचा मानस भाजपचा असुन या निवडणुकीचा हाच पक्षाचा अजेंडा असल्याचे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यानी व्यक्त केले. ते शनिवारपासुन (ता.२१) मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन त्यानी प्रचार बैठका घेण्यास सुरवात केली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या विविध भूमिकांवर शंका उपस्थित करुन चौफेर टीकास्त्र सोडले.

श्री.दरेकर म्हणाले की, शाळा सुरु करण्याबाबत सरकारची भुमिका गोंधळाची असुन मुंबई-ठाणे येथील शाळा सूरु करणार नसल्याचे सरकार सांगत आहे. उस्मानाबादमध्ये शाळा सुरु करणार का याविषयी अजुनही निर्णय झालेला नाही. जो न्याय मुंबईत तो इतर शहरात का नाही असा सवाल श्री.दरेकर यांनी सरकारला विचारला.
विजेच्या बाबतीतही सरकारने दिलेला शब्द पाळलेला नाही. ऊर्जामंत्री यांनीच पहिल्यांदा वीजबिल माफ करण्याबाबत शब्द दिलेला होता. आता मात्र सक्तीने वीजबिल वसुल करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. यामुळे सामान्य वीज ग्राहकांच्या जखमेवर सरकारने मीठ चोळण्याचे काम केले आहे.

खात्याचा कारभार चालविता येत नसेल तर ऊर्जामंत्र्यांनी राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्कची नोकरी करावी, असा टोलाही श्री.दरेकर यानी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना लगावला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला मतदाराकडुन अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका बाजूला भाजपचा अष्टपैलु उमेदवार असुन त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार ज्यांची दोनवेळेची निष्क्रिय कारकिर्द असा सरळ प्रचार होत असल्याने भाजपच्या उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होईल असा विश्वास श्री. दरेकर यांनी व्यक्त केला.

सतीश चव्हाण हे गेली बारा वर्ष सातत्याने आमदार म्हणुन काम करत आहेत. त्यातील सात वर्ष सत्तेत होते. तरीही त्यांच्याकडुन मराठवाड्याच्या हिताचा एकही निर्णय त्यांच्याकडुन घेतला नाही. ठाम भूमिका घेऊन मराठवाड्याच्या प्रश्नांवर लढण्यासाठी एका सक्षम आमदाराची गरज असुन त्यासाठी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना मतदान करण्याचे आवाहन त्यानी केले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power Minister Should Resign And Join Clark Of Mahavitran, Pravin Darekar's Advise To Raut