PMFBY: सव्वालाख शेतकऱ्यांना 100 कोटींची भरपाई

विकास गाढवे
Monday, 1 February 2021

पीकविम्यातील ऑनलाइन अर्जाचा धमाका; ऑनलाइन अर्ज केलेल्यांनाच लाभ 

लातूर: मागील वर्षांत सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन खरिपातील पिके व फळबागांच्या झालेल्या नुकसानीची शंभर कोटींची भरपाई विमा कंपनीने मंजूर केली आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे अर्ज ऑनलाइन भरलेल्या शेतकऱ्यांना या भरपाईची लॉटरी लागली असून, यात मोठ्या संख्येने नुकसान न झालेल्या शेतकऱ्यांचाही समावेश असल्याचे दिसत आहे. अनेक गावात मोजक्याच शेतकऱ्यांना या भरपाईची मिळाल्याने अर्ज न केलेल्या शेतकऱ्यांचा तिळपापड होत असून, शेतकऱ्यांनी कृषी सेवकांना चांगलेच घेरले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात मुग व उडीद काढणी आल्यानंतर तसेच सोयाबीन काढणीच्या वेळी जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने केल्यानंतर सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले. हे वाटप पूर्ण होत असतानाच काही शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा कंपनीकडून भरपाईची रक्कम जमा होऊ लागली आहे. पंधरा दिवसांपासून पीकविम्याचा हा धमाका उडाला असून, या भरपाईचा लाभ केवळ अतिवृष्टीच्या काळात ऑनलाइन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनाच होत आहे.

लातुरातील आग शॉटसर्किटमुळेच; पालकमंत्र्यांकडूनही चौकशीचे आदेश

अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीकविमा योजनेतून तातडीने भरपाई देण्यात येते. या भरपाईला आयएलए असेही म्हणतात. नुकसान झाल्यानंतर ७२ तासांत शेतकऱ्यांना त्याची माहिती ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करून द्यावी लागते. त्यानंतर विमा कंपनी व कृषी विभागाकडून पंचनामे होऊन नुकसान झालेल्या पिकांसाठी कंपनीकडून भरपाई मंजूर करण्यात येते. ऑनलाइन अर्ज करण्याच्या कालावधीत यावर्षी अतिवृष्टी न झालेल्या भागातील शेतकऱ्यांनीही ऑनलाइन अर्ज केले. त्यांचे पंचनामे विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी कृषी विभागाच्या परस्पर नुकसानीच्या ठिकाणी न जाता पूर्ण केले.

त्यावर कृषी सेवकांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला. यामुळे तिढा झाला होता. शेवटी विमा कंपनीच्या पंचनाम्यावरच भरपाई मंजूर करण्यात आली व त्याचे वाटप सुरू झाले आहे. यामुळे अनेक गावातील शेतकरी चिडेल असून त्यांनी कृषी सेवकांना जाब विचारण्यास सुरवात केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ३६ कोटी ५९ लाख वीस हजार ८२५ रुपये भरपाईचे वाटप शेतकऱ्यांना झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

उमरगा भाजपचे माजी तालुकाध्यक्षांचा औशाजवळील अपघातात मृत्यू, पती-पत्नी जखमी

सरसकट भरपाई मंजूर 
अतिवृष्टीने पीक व फळबागांचे नुकसान झाल्याबाबत जिल्ह्यातून एक लाख २२ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज केले होते. या शेतकऱ्यांना शंभर कोटीची नुकसानभरपाई मंजूर झाल्याची माहिती राष्ट्रीय विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी संतोष भोसले यांनी दिली. दरम्यान, यातील ५२ हजार शेतकरी भरपाईसाठी अपात्र असतानाही त्यांना भरपाई मंजूर झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी नुकसान झाले नसतानाही ऑनलाइन अर्ज केले होते. उसाचे पीक असताना दुसऱ्याच पिकांचे नुकसान झाल्याची माहिती भरली. या स्थितीत विमा कंपनीने उडीद, मूग, सोयाबीन, बाजरी, तूर, खरीप ज्वारी व कापूस पिकांसाठी भरपाई मंजूर झाल्याने शेतकऱ्यांत आश्चर्य व्यक्त होत आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pradhan Mantri Fasal Bima Yojana PMFBY 100 crore compensation all farmers