VIDEO : राजकारणी हे आमच्यापेक्षा मोठे अभिनेते : प्रशांत दामले

संदीप लांडगे
Friday, 6 December 2019

राजकारणी हे आमच्यासारख्या कलाकारांपेक्षा किती मोठे अभिनेते आहेत! सत्ताधाऱ्यांनीच हे काम करावे, असे नाही. विरोधी पक्ष, महापालिका अधिकारी किंवा रंगभूमीविषयी ज्यांना प्रेम आहे, त्यांनी प्रयत्न केले तरी हे काम होऊ शकते. यापेक्षा जे या क्षेत्राशी निगडित आहेत त्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला. 

औरंगाबाद -  दोन वर्षांपूर्वी नाट्यगृहाची अवस्था पाहून आम्ही स्वच्छता मोहीम राबविली होती; तसेच रंगमंदिर दुरुस्तीची महापालिका प्रशासनाकडे मागणी केली होती; परंतु पूर्वी संत एकनाथ रंगमंदिराची जी अवस्था होती, त्यापेक्षा वाईट आता करून ठेवली आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांनी महापालिकेचे वाभाडे काढले.

दोन वर्षांत महापालिका प्रशासन साधे रंगमंदिर उभारू शकत नाही, हे लज्जास्पद आहे. जी कामे केली तीही चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याची नाराजीदेखील त्यांनी व्यक्त केली. शिवाय मागच्या महिन्यात सगळ्या महाराष्ट्राने पाहिले, की राजकारणी हे आमच्यासारख्या कलाकारांपेक्षा किती मोठे अभिनेते आहेत! सत्ताधाऱ्यांनीच हे काम करावे, असे नाही. विरोधी पक्ष, महापालिका अधिकारी किंवा रंगभूमीविषयी ज्यांना प्रेम आहे, त्यांनी प्रयत्न केले तरी हे काम होऊ शकते. यापेक्षा जे या क्षेत्राशी निगडित आहेत त्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला. 
 
प्रशांत दामले यांनी गुरुवारी (ता. पाच) सकाळी साडेदहा वाजता संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरुस्ती कामाची पाहणी केली. यावेळी शहरातील अनेक कलावंत, नाट्यप्रेमी यांची उपस्थिती होती. रंगमंदिराची पाहणी केल्यानंतर प्रशांत दामले म्हणाले, की दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर 2017 ला नाट्यगृहाची दयनीय अवस्था पाहून आम्ही कलाकारांनी स्वच्छता मोहीम राबविली होती.
त्यावेळी नाट्यमंदिराची झाडलोट, साफसफाई, पडदे शिवणे, स्टेजच्या वर आलेले खिळे काढणे आदी कामे केली होती; तसेच दुरुस्तीची प्रशासनाकडे मागणी केली होती. 

हेही वाचा : प्रबोधनकार ते आदित्य, ठाकरे कुटुंबातील चौथी पिढी काय करते? वाचा.... 

आर्थिक तरतूद न करता महापालिका प्रशासनाने हे काम का सुरू केलं? जर दुरुस्तीचे काम सुरू केले तर ते कधी पूर्ण होणार याचीही कमिटमेंट दिली नाही. दुरुस्तीसाठी सहा महिने लागतील असे सांगितले, नंतर पुन्हा तीन महिने वाढवून सांगितले. अजूनही काम पूर्ण नाही. त्यामुळे प्रशासनाने काम पूर्ण होण्यासाठी निश्‍चित वेळ तरी द्यावी, अशी मागणी त्यांनी
केली. 
  
संत एकनाथ रंगमंदिर परिसरातील नगरसेविका शिल्पाराणी वाडकर आणि महापालिका अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. प्रशांत दामले यांनी अधिकाऱ्यांना संत एकनाथ रंगमंदिराचे काम किती झाले? कशामुळे रखडले? किती दिवस लागणार? असे एकामागून एक प्रश्न विचारले; परंतु महापालिका अभियंता के. डी. देशमुख, नाना पाटील, बी. के. परदेशी
यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. 

कामात मोठ्या चुका 
नाट्यमंदिराच्या कामात मोठ्या प्रमाणात चुका झाल्या असून दुरुस्तीनंतर स्टेज आठ इंच वर करण्यात आले आहे. त्यावर पुन्हा फळ्या टाकण्यात आल्याने बाल्कनीत बसलेल्या प्रेक्षकांना व्यवस्थित नाटक किंवा कलाकार दिसणार नाहीत. स्टेजसमोर माईकसाठी फक्त चार वायरिंग लागत असताना दहा ते पंधरा वायर काढून ठेवल्या आहेत. नाट्यमंदिराचे काम करीत
असताना रंगकर्मी, कलाकार, तंत्रज्ज्ञ यांचे मत जाणून घ्यायला हवे. नाट्यकर्मींची समिती करा, त्यावर व्यावसायिक मराठी रंगभूमीच्या औरंगाबाद व मुंबईच्या एका कलाकाराची नेमणूक करा, म्हणजे चुकीची कामे होणार नाहीत, असे मत प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. 

नोटाचे राजकारण  
पक्ष, आमदारांचे सध्या ज्या पद्धतीचे फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे, त्यावर आधारित सरस्वती भुवनच्या विद्यार्थ्यांनी "नोटाचे राजकारण' ही छोटीसी नाटिका सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. नाटिकेत रोहन त्रिभुवन, श्रद्धा शेलार, प्रतीक दाभाडे, जान्हवी पाटील, विजय खरात, सुमित तौर आदींनी भूमिका केल्या होत्या. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prashant Damle's reaction On Sant Eknath Theater