प्रसुतीसाठी महिलेला भरपावसात बाजेवर आणले... 

मंगेश शेवाळकर
मंगळवार, 30 जुलै 2019

जिल्हा परिषद प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रस्त्याच्या प्रश्नावर कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला जात नसल्याने रस्त्याचा प्रश्न कायम आहे. जिल्हा परिषदेच्या वेळकाढू धोरणामुळे गावकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील करवाडीकरांची रस्त्याची प्रतिक्षा कायम असून मंगळवारी (ता.३०) एका महिलेस  प्रसुतीसाठी सुमारे पाच किलोमिटर अंतरापर्यंत भर पावसात बाजेवर  टाकून आणावे लागले आहे. त्यामुळे गावकऱ्यांतून प्रशासनाविरुध्द 
संताप व्यक्त होऊ लागला आहे. 

तालुक्यातील करवाडी  हे नांदापूर ग्रामपंचायतीअंतर्गत गाव आहे. या ठिकाणी जाण्यासाठी रस्ताच नाही. नांदापूर येथील पांदण रस्त्याने गावात जावे लागत आहे. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिने या गावातील गावकऱ्यांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत.  पावसाळ्यात बाहेरगावी जाण्यासाठी सुमारे पाच किलोमिटर अंतराचा चिखल तुडवत नांदापूर येथे यावे लागत असून त्यानंतर पुढील प्रवास करावा लागत आहे. तर रुग्णांना उपचारासाठी चक्क बाजेवर टाकून  आणावे लागत आहे. मागील वर्षी सदर प्रकार घडल्यानंतर प्रशासनाने  रस्त्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. मात्र रस्त्याचे काम सुरु झाले नाही. 

दरम्यान, आज सकाळी गावातील सुवर्णा गणेश ढाकरे या महिलेस  प्रसुती वेदन होत होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे  आवश्यक असल्याने गावकऱ्यांनी त्यांना एका मेनकापडात बांधून  बाजेवर टाकले. त्यानंतर पाच किलोमिटर पायपीट करून चौघांनी बाज खांद्यावर घेऊन त्यांना नांदापूर येथे आणले. त्यानंतर तेथून  रुग्णवाहिकेद्वारे हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारानंतर रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

जिल्हा परिषद प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रस्त्याच्या प्रश्नावर कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला जात नसल्याने रस्त्याचा प्रश्न कायम आहे. जिल्हा परिषदेच्या वेळकाढू धोरणामुळे गावकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pregnant women carried to hospital in rain