पंतप्रधान विमा योजनेची गाडी सुसाट

प्रकाश बनकर
मंगळवार, 19 जून 2018

देशभरात 18, तर राज्यात 1.15 कोटी नागरिकांनी उतरविला विमा

देशभरात 18, तर राज्यात 1.15 कोटी नागरिकांनी उतरविला विमा
औरंगाबाद - सर्वसामान्य नागरिकांसाठी पंतप्रधान जीवन ज्योती योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. या योजनांना देशभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. ता. 31 मार्चपर्यंत या दोन्ही योजना मिळून देशातील 18 कोटी 80 लाख; तर राज्यात एक कोटी 15 लाख नागरिकांनी विमा उतरवून घेतला आहे. राज्यात योजनेचा लाभ घेण्यात पुणे आघाडीवर; तर वाशीम पीछाडीवर असल्याची माहिती स्टेट लेव्हल बॅंकर्स कमिटीने दिली.

केंद्र सरकारतर्फे मे 2015 मध्ये 18 ते 50 वर्षे वयोगटासाठी 330 रुपये भरून पंतप्रधान जीवन ज्योती योजना सुरू केली. यात सहभागी होणाऱ्यांना दोन लाखांचे विमा सुरक्षा कवच देण्यात आले. यासह फेब्रुवारी 2015 मध्ये 18 ते 70 वर्षे वयोगटासाठी 12 रुपये भरून पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू करण्यात आली आहे. यातून दोन लाख रुपयांचे सुरक्षा कवच दिले जाते. खासगी विमा कंपन्यांपेक्षाही स्वस्त आणि मोठा फायदा देणाऱ्या या विमा योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सार्वजनिक आणि खासगी बॅंकाही या योजनेसाठी पुढे आल्याने विमा उतरवून घेणाऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामध्ये राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर; तर वाशीम पीछाडीवर आहे. पुण्यातील 15 लाख 1 हजार 221; तर वाशीम जिल्ह्यातील केवळ 38 हजार जणांनी या योजनांअंतर्गत विमा उतरवून घेतला.

राज्यातील स्थिती
- पंतप्रधान सुरक्षा विमा योजना - 80 लाख 51,046
- प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना - 34 लाख 61,526
- एकूण - 1 कोटी 15 लाख 12,572

- पुणे - 15,01,221
- ठाणे - 12,83,670
- मुंबई उपनगर - 11,61,080
- मुंबई - 90,0166
- नागपूर - 6,45,727
- नाशिक - 5,87,288
- कोल्हापूर - 4,90,078
- जळगाव - 4,01,791
- औरंगाबाद - 2,83,556

Web Title: prime minister scheme