पंतप्रधान जातीबद्दल बोलतात मग मराठा आमदारांना का लाज वाटते?

हरी तुगावकर
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मी ओबीसी आहे, असे जाहिरपणे सांगत आहेत. असे असताना राज्यातील मराठा आमदारांना मात्र आपण मराठा आहोत हे सांगायला का लाज वाटते असा सवाल मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी केली आहे.

लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मी ओबीसी आहे, असे जाहिरपणे सांगत आहेत. असे असताना राज्यातील मराठा आमदारांना मात्र आपण मराठा आहोत हे सांगायला का लाज वाटते असा सवाल मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी केली आहे. शुक्रवारी (ता. 3) लातूर ग्रामीणचे आमदार अ़ॅड. त्र्यंबक भिसे यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या व घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी तरुणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या आंदोलनाला पाठिंबा देत आमदार भिसेही त्यात सहभागी झाले. पंतप्रधान जाती बद्दल बोलतात. रामदास आठवले यांना जातीचा अभिमान आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ ओबीसीबद्दल जाहिरपणे पुढे येतात. पण मराठा आमदारांना मात्र मराठा म्हणून घेण्याची लाज वाटत आहे. राज्यात पन्नास टक्के आमदार हे मराठा समाजाचे आहेत. पण ते मराठा आरक्षणाच्या मुद्यावर कधीच एकत्र आल्याचे दिसत नाही. तुम्ही बहुमतात असताना गप्पा का असा प्रश्न आहे. आता आंदोलनकांनी मूक पणा सोडला आहे. आमदारांनीही मूक पणा सोडावा. मराठा समाजाचे १४५ आमदार `वर्षा`वर गेले तर मुख्यमंत्र्यांना देखील धडकी भऱेल असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

आता मराठा आरक्षण, महिलांना संरक्षण, शेतकरय़ांना स्वामीनाथन व मराठा मुलांना मोफत शिक्षण दिल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. काँग्रेसने भूमिका बदलली तर राजीनामा देणार या आंदोलनात आमदार भिसेही सहभागी झाले. त्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेस मराठा समाजासोबत आहे. या पुढे काँग्रेसने आपली भूमिका बदलली तर पहिल्यांदा मी काँग्रेसचा तसेच आमदारकीचाही राजीनामा देईल, असे त्यांनी यावेळी जाहिर केले. आपण मराठे आहोत. मरायचे नाही तर लढायचे आहे. आत्महत्या करू नका. मी तुमच्यासोबत आहे. मुस्लिम समाजालाही आरक्षण दिले पाहिजे. या समाजाला सोबत घेतले तर अतिरेकी होणार नाही, असे मतही भिसे यांनी यावेळी मांडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prime minister talks about caste then why maratha MLA ashamed of it