पृथ्वीराज बी.पी.लातूरचे नवे जिल्हाधिकारी, जी.श्रीकांत यांची अकोल्याला बदली

हरी तुगावकर
Tuesday, 8 December 2020

गेली अडीच वर्षे आपल्या कामाने लोकप्रिय झालेले लातुरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची अकोला येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली आहे.

लातूर : गेली अडीच वर्षे आपल्या कामाने लोकप्रिय झालेले लातुरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची अकोला येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली आहे. राज्य शासनाने मंगळवारी (ता.आठ) बदलीचे आदेश काढले. त्यांच्या जागी परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. येत आहेत.
अडीच वर्षापूर्वी रुजू झाल्यानंतर जी. श्रीकांत यांनी कामाचा धडाका लावला. त्यात काही दिवस महापालिका आयुक्त पदाचा पदभारही त्यांच्याकडे होता. यात त्यांनी शहरातील वर्षानुवर्षे राहिलेली अतिक्रमणे काढली. कर वसुलीला काही प्रमाणात शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होवू नयेत म्हणून त्यांनी राबवलेले ‘मिशन दिलासा’ चे राज्यभऱ कौतुक झाले.

 

 

आपल्या कार्यकाळात त्यांनी प्रशासन व लोकातील अंतर दूर करण्याचा प्रयत्न केला. लोकात मिसळण्याचा त्यांचा अंदाजाचे सर्वानाच भावला. मरगळलेल्या प्रशासनात त्यांनी कार्यातून ऊर्जा दिली. कोरोनाकाळात त्यांनी केलेले कामाची राज्य शासनानेही दखल घेतली. त्यांच्या ‘ॲऩ्टी कोरोना पोलिस’ आणि ‘ॲऩ्टी कोरोना फोर्स’ या उपक्रमांचे इतर जिल्ह्यांनीही अनुकरण केले. कोरोना रुग्णांच्या समुपदेशनातही ते मागे राहिले नाहीत. यासंदर्भात त्यांनी राबवलेला फेसबूक लाईव्हचा उपक्रमही गाजला. त्यातून लोकांना दररोज माहिती मिळत गेली. जी. श्रीकांत यांनी एकीकडे अनेकांना कायद्याचा बडगाही दाखवला तर दुसरीकडे समाजात मिसळून किती चांगले काम करता येते हेही दाखवून दिले. केवळ जिल्हाधिकारी म्हणून ते वावरले नाहीत तर एक स्पोर्टी अधिकारी म्हणून त्यांचे काम राहिले. क्रीडा स्पर्धा असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो, त्यांचा पुढाकार नेहमी राहिला.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prithviraj BP New District Collector Of Latur