esakal | खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अवाजवी बिल; अधिकाऱ्यांनी तपासूनच द्यावे बिल

बोलून बातमी शोधा

private covid hospital
खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अवाजवी बिल
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

उस्मानाबाद : शहरासह जिल्ह्यातील खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून अवाजवी बिलाची आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी नातेवाईकांकडून येत आहेत. त्यामुळे प्रत्येक खासगी हॉस्पिटलचे बिल शासकीय अधिकाऱ्यांनी तपासून द्यावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत. मात्र, आता बिलाचे संकट आहे. अनेक रुग्ण उसनवारी करून रुग्णालयात उपचार घेत आहेत. जीव वाचल्याचे समाधान त्यांना आहे. मात्र, हा पैसा कसा उभा करायचा याची चिंता रुग्णांसह नातेवाईकांना सतावत आहे. अनेक रुग्णांकडून अवाजवी पैसे आकारल्याच्या तक्रारी येत आहेत. सध्या कठीण परिस्थिती आहे. कोणत्याही दवाखान्यात ऑक्सिजन बेड मिळणे कठीण आहे. अशा परिस्थितीत बेड मिळल्याचे नशीब समजून रुग्ण बिलाचा उसनवारीवर भरणा करतात. काही रुग्णालयात तर ऑक्सिजनचा पुरवठा न करताही लाखोंच्या घरात बिलाचा आकडा जात आहे. तर अनेक रुग्णांना कारण नसतानाही जास्तीचे दिवस रुग्णालयात ठेवले जात असल्याने त्यांच्याकडून जास्तीची वसुली होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.

हेही वाचा: संचारबंदी काळात दुय्यम निबंधक कार्यालय सुरूच, कोरोना नियमांचा फज्जा

उपाययोजना करा

शासनाने प्रत्येक रुग्णालयाचे आणि उपचाराचे दर ठरवून दिले आहेत. त्यापेक्षा जास्तीची आकारणी केली जात असल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे. सध्या बेड, ऑक्सिजन, आयसीयू बेडचे चार्जेस किती? याबाबत शासनाच्या गाईडलाइन आहेत. त्याप्रमाणे रुग्णांकडून आकारणी करणे गरजेचे आहे. शासनाने जिल्हा तसेच तालुकास्तरावर एक अधिकारी नेमून बिल तपासावे. त्याप्रमाणेच रुग्णांकडून बिलाची आकारणी करावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे पुण्यासारख्या जिल्ह्यात तसेच शहरात शासकीय अधिकारी तपासूनच बिलाचा भरणा केला जात आहे. मग, उस्मानाबाद जिल्ह्यातही अशाच पद्धतीने डॉक्टरांच्या बिलांचा भरणा व्हावा, अशी मागणी होत आहे. त्याला प्रशासन, लोकप्रतिनिधी किती प्रतिसाद देतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.