शेतकऱ्यांचा कल खासगी दूध संकलन केंद्राकडे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

उमरगा - शेतकऱ्यांचा कल खासगी दूध संकलन केंद्राकडे वाढला आहे. चार पैसे जादा मिळत असल्याने तालुक्‍यातील दोन खासगी दूध संकलन केंद्रात दररोज सुमारे अठरा हजार लिटर दूध संकलित होत आहे; मात्र गेल्या 25-30 वर्षापासून कार्यरत शासकीय दूध शीतकरण केंद्रात केवळ एक हजार लिटर दूध संकलित होत आहे. 

उमरगा - शेतकऱ्यांचा कल खासगी दूध संकलन केंद्राकडे वाढला आहे. चार पैसे जादा मिळत असल्याने तालुक्‍यातील दोन खासगी दूध संकलन केंद्रात दररोज सुमारे अठरा हजार लिटर दूध संकलित होत आहे; मात्र गेल्या 25-30 वर्षापासून कार्यरत शासकीय दूध शीतकरण केंद्रात केवळ एक हजार लिटर दूध संकलित होत आहे. 

तालुक्‍यातील शेतीव्यवसाय निसर्गावरच अवलंबून आहे. कोरडवाहू क्षेत्र अधिक असल्याने पावसावरच शेतीचे उत्पन्न अवलंबून असते. शेतीबरोबरच जोडव्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय सुरू केला आहे. दुष्काळी स्थितीमुळे हा व्यवसाय मोडकळीस आला होता. बऱ्याच शेतकऱ्यांनी चाऱ्याअभावी दुधाळ जनावरांची विक्री केली. त्यामुळे यंदा चारा, पाणी उपलब्ध असले तरी अपेक्षित दूध संकलनावर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे. 

शासकीय केंद्रापेक्षा खासगी संस्था जास्त दर देत असल्याने शेतकरी खासगी संकलन केंद्रात दूध पाठवत आहेत. 3.5 व 8.5 फॅट असलेल्या गायीच्या दुधाला प्रतिलिटर बावीस रुपये दर तर एक रुपया कमिशन आहे. 6.0 व 9.0 फॅट असलेल्या म्हशीच्या दुधाला 32 रुपये दर तर एक रुपया कमिशन आहे. मुळज येथील पांडुरंग दूध संकलन केंद्रात व मातोळा येथील डायनॅमिक दूध केंद्रात दररोज आठ ते नऊ हजार लिटर दूध संकलन होते. दरम्यान, पांडुरंग दूध संकलन केंद्राने बंद पाकीट दुधाची विक्री सुरू केली आहे. 

ग्रामीण भागातील दूध संस्थाही अवसायनात 
उमरग्यातील शासकीय दूध शीतकरण केंद्रात साधारणतः पाच-सहा वर्षापूर्वी आठ ते दहा हजार लिटर दूध संकलित होत होते. जिल्हा दूध संघाची अवस्था बिकट झाल्याने त्याअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील दूध संस्थाही अवसायनात आल्या. परिणामी शासकीय दूध केंद्राकडे संस्थेचा कल कमी झाला. सध्या पळसगाव, गुगळगाव, माळेगाव, पांढरी, जेवळी व वडगाववाडी येथील सात संस्थेचे दूध केवळ आठशे ते हजार लिटरपर्यंतच दूध संकलन होत आहे. 3.5 व 8.5 फॅट असलेल्या गायीच्या दुधाला प्रतिलिटर बावीस रुपये दर तर एक रुपया 77 पैसे कमिशन आहे. तर 6.0 आणि 9.0 फॅट असलेल्या म्हशीच्या दुधाला 31 रुपये दर तर एक रुपया 90 पैसे कमिशन आहे. खासगी दूध संकलन केंद्रापेक्षा दरात अगदी थोडी तफावत असली तरी रक्‍कम लवकर मिळत नसल्याने शासकीय केंद्रात दूध संकलनाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात पुन्हा आता कॅशलेस व्यवहाराची भर पडली आहे. उदगीरच्या शासकीय दूध डेअरी प्रशासनाने सरकारी दूध केंद्रावर पीओएस मशीन बसविण्याचे निर्देश दिले आहेत. एक जानेवारीपासून असा व्यवहार सुरू करण्याचे आदेश होते मात्र मोजक्‍याच संख्या, त्यात स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखेचे खाते उघडण्यास सांगितल्याने संस्था व सभासदांसमोर अडचणी वाढल्या आहेत.

Web Title: Private farmers tend to milk collection center