धर्मादाय संस्थांना देणार पुरस्कार - शिवकुमार डिगे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

लातूर - राज्यातील वैद्यकीय, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रांत चांगले काम करणाऱ्या चार धर्मादाय संस्थांची निवड करून त्यांना राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी येथे केली. यंदापासून हा उपक्रम सुरू केला जाणार असून तो दरवर्षी राबविला जाईल. धर्मादाय संस्थांच्या निधीतून राज्यातील गरीब गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

लातूर जिल्हा धर्मादाय संस्था सामूहिक विवाह समितीची आढावा बैठक शुक्रवारी (ता. 22) येथे झाली. त्या वेळी ते बोलत होते. धर्मादाय कार्यालय आता सरकारी कार्यालय राहिले नाही तर ते समाजाभिमुख झाले आहे. सामुहिक विवाह सोहळा उपक्रमाला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. या पुढेही गरीब मुलींच्या वडिलांनी चिंता करण्याचे कारण नाही. सामूहिक विवाह सोहळे दरवर्षी घेतले जाणार आहेत. त्याशिवाय चांगले काम करणाऱ्या राज्यातील वैद्यकीय, शिक्षण, धार्मिक व सामाजिक धर्मादाय संस्थांना यंदापासून पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, असे डिगे म्हणाले.

Web Title: Prizes to charity organizations shivkumar dige