औरंगाबाद जिल्ह्यात सभापती निवडीच्या 'पंचायती'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

जिल्ह्यातील त्रिशंकु असलेल्या पंचायत समित्या ताब्यात घेण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांकडून जोरदार फिल्डींग लावली जात आहे. औरंगाबाद पंचायत समितीमधील प्रमुख पक्षांनी सदस्यांना सहलीस पाठविले आहे. जिल्ह्यात औरंगाबाद, वैजापुर, कन्नड, सोयगाव या चार पंचायत समितीत त्रिशुंक अवस्था आहे.

औरंगाबाद - जिल्ह्यातील त्रिशंकु असलेल्या पंचायत समित्या ताब्यात घेण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांकडून जोरदार फिल्डींग लावली जात आहे. औरंगाबाद पंचायत समितीमधील प्रमुख पक्षांनी सदस्यांना सहलीस पाठविले आहे. जिल्ह्यात औरंगाबाद, वैजापुर, कन्नड, सोयगाव या चार पंचायत समितीत त्रिशुंक अवस्था आहे.

मंगळवारी (ता. 14) सभापतींची निवड होणार आहे. आपलाच सभापती व्हावा यासाठी त्रिशुंक पंचायत समितीमधील प्रमुख पक्षांनी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान, भाजपला खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड पंचायत समितीत, तर शिवसेनेला पैठण येथे स्पष्ट बहुमत आहे. गंगापुरात भाजप-शिवसेनेचे प्रत्येकी 9 सदस्य आहेत.
औरंगाबाद पंचायत समितीतील सत्ता राखण्यासाठी सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या कॉंग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. एकूण 20 जागांत सर्वाधिक आठ जागा कॉंग्रेसकडे आहेत. भाजपकडे 7, शिवसेनेकडे 3 तर अपक्ष 2 सदस्य आहेत. यामध्ये सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती आहेत. शिवसेना-भाजप एकत्र आले तर त्यांना सत्तेच्या जवळ जाता येईल तर दोन्ही अपक्ष सोबत आले तरी कॉंग्रेसला बहुमतासाठी आणखी दोन सदस्यांची गरज आहे. सध्या कॉंग्रेस पक्षाने आपल्या सदस्यांना सहलीवर पाठविले आहे. खुलताबादमध्ये 6 पैकी 4, फुलंब्रीत 8 पैकी 7, सिल्लोडमध्ये 16 पैकी 9 जागा जिंकुन भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. गंगापुरमध्ये शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र येणार की एकमेकांविरुद्ध दंड थोपटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वैजापुरात 16 पैकी शिवसेनेकडे 7, भापजकडे 3, राष्ट्रवादीकडे 5 तर कॉंग्रेसकडे 1 सदस्य आहे. येथे युती झाली तर सहज सत्ता मिळु शकते. मात्र शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस एकत्र आले तरी भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागेल. कन्नड पंचायत समितीत भाजप आणि आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या आघाडीकडे प्रत्येकी पाच सदस्य आहे. शिवसेना 3, कॉंग्रेस 2 तर राष्ट्रवादीकडे 1 सदस्य आहे. येथेही सभापतीपदासाठी चुरस आहे. भाजप-सेनेची युती झाली तरी त्यांना एक सदस्याची गरज भासणार आहे. याउलट आमदार जाधव यांची आघाडी, कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकत्र आले तरीही त्यांची सदस्यसंख्या आठच होते. त्यामुळे येथे आता कोणती सत्ता समीकरण जुळतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. सोयगावात कॉंग्रेसकडे सर्वाधिक तीन, त्याखालोखाल भाजपकडे 2 तर शिवसेनेकडे 1 जागा आहे. कॉंग्रेसला सत्तेसाठी 1 जागा आहे.

तर भाजपला तीन जागीच सत्ता
पंचायत समितीमध्ये शिवसेना-भाजप एकत्र येतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना वरिष्ठ पातळीवरुन अजून आदेश आलेले नसल्याने त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवेसना एकत्र आले तर भाजपला स्पष्ट बहूमत असलेल्या केवळ तीन पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन करता येईल. गंगापुरात मात्र भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी 9 जागा मिळाल्याने येथे दोघेही एकमेकांविरुद्ध दंड थोपटण्याच्या मनस्थितीत आहेत.

जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडीकडे आमचे लक्ष आहे. त्यासाठी आमचा प्रयत्नही सुरु आहे. त्यामुळे 14 मार्चनंतर आम्ही जिल्हा परिषदेसाठी काय करायचे यावर चर्चा करु.
- नामदेव पवार, शहर जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस

आम्हाला पंचायत समित्यांसाठी अद्याप कोणतेही आदेश आलेले नाहीत. आदेश मिळाले नाही तर निवडणुकीदिवशी ऐनवळी स्थानिक नेते निर्णय घेतील. जिल्हा परिषदेसाठीही आदेश मिळालेले नाहीत.
- अंबादास दानवे (जिल्हाप्रमुख)

Web Title: Problems with ZP president selection