वाहन जगतातील उत्पादने आता एकाच छताखाली

आदित्य वाघमारे
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

औरंगाबाद - जगभरातील ऑटो कंपन्यांमध्ये रुबाब असलेल्या औरंगाबादेतील ऑटो पार्ट निर्मितीची बलस्थाने आता एकाच छताखाली दिसणार आहेत. वाळूजच्या मराठवाडा ऑटो क्‍लस्टरमध्ये 10 हजार चौरस फूट जागेवर शंभर कंपन्यांची उत्पादने एकत्रितपणे दाखविणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे "उत्पादन प्रदर्शन केंद्र' प्रत्यक्षात आले आहे.

"करतो मणभर, सांगतो कणभर' या वृत्तीमुळे दबदबा असला, तरी तो जगाला सांगण्यात येथील उद्योग कमी पडतात. त्यावर उतारा म्हणून आता मराठवाडा ऑटो क्‍लस्टरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी दहा हजार चौरस फूट जागेवरील प्रदर्शनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये औरंगाबादेतून जगाच्या वाहन कंपन्यांना सुटे भाग पुरवणाऱ्या 100 कंपन्यांच्या उत्पादनांना येथे स्थान देण्यात येणार आहे.

मराठवाड्याचा माहितीपट
औरंगाबादसह मराठवाड्याची माहिती सगळ्यांना व्हावी, यासाठी या प्रदर्शनाच्या सुरवातीलाच माहितीपट दाखवला जाणार आहे. या माहितीपटातून मराठवाड्याच्या औद्योगिक बलस्थानांची आणि अन्य माहितीही देण्यात येणार आहे. प्रदर्शन केंद्र उभारणीसाठी पहिल्या टप्प्यात सव्वा कोटीचा खर्च करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात हे काम झाल्यावर अजून 100 कंपन्यांना समाविष्ट करून घेण्यासाठी काम सुरू केले जाणार आहे.

आपण करतो खूप, मात्र त्याची जाहिरात करण्यात मागे पडतो. आपल्या बलस्थानांचा परिचय सगळ्यांना व्हावा, यासाठी मराठवाडा ऑटो क्‍लस्टरमध्ये हे प्रदर्शन केंद्र उभारण्यात येत आहे.
- उमेश दाशरथी, अध्यक्ष, मराठवाडा ऑटो क्‍लस्टर

Web Title: Production display center in Aurangabad