तपासणीदरम्यान तफावती आढळल्याने परवाना निलंबनाचा प्रस्‍ताव, कुठे ते वाचा...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील एका स्वस्तधान्य दुकानामधून लाभार्थी नागरिकांना व्यवस्थित धान्य वितरीत होत नसल्याच्या तक्रारी पाहता कळमनुरी तालुक्यात उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी एका स्वस्त धान्य दुकानाची तपासणी केली. या वेळी धान्य वाटप व नोंद पुस्तिकेमध्ये आढळलेल्या तफावती व अनियमितता पाहता या दुकानाचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला. 

कळमनुरी ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील एका स्वस्तधान्य दुकानामधून लाभार्थी नागरिकांना व्यवस्थित धान्य वितरीत होत नसल्याच्या तक्रारी पाहता उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी या दुकानाची तपासणी केली. या वेळी धान्य वाटप व नोंद पुस्तिकेमध्ये आढळलेल्या तफावती व अनियमितता पाहता या दुकानाचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

या बाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील स्वस्तधान्य दुकानदारांच्या माध्यमातून लाभार्थी नागरिकांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही काही ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदारांकडून याकामी अनियमितता होत असल्याच्या तक्रारी लाभार्थी नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - ऑनलाइन देयके भरण्याला ‘या’ तालुक्याची पसंती

दुकानदारांची तपासणी करण्याकरिता चार पथक
लाभार्थी नागरिकांची गैरसोय होऊ नये व स्वस्तधान्य दुकानदाराकडून वितरण प्रणालीमध्ये गोंधळ होऊ नये, याकरिता प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानदारांची तपासणी करण्याकरिता चार पथक नेमले आहेत. त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी लाभार्थी नागरिकांच्या तक्रारीवरून बुधवारी (ता.आठ) शहरातील प्रकाश वर्मा यांच्या स्वस्त धान्य दुकानाची तपासणी केली होती. या तपासणीमध्ये युनिट नोंदवही, साठा नोंदवही, ई-पॉज मशीन पावती, धन्याचा नमुना, भाव फलक, अंत्योदय, बीपीएल व शेतकरी योजनेच्या लाभधारकांची ऑनलाइन यादी, साठा दर्शवणारे फलक, धान्य वाटप नोंदवही यामध्ये अनियमितता आढळून आली.

हेही वाचा - पिकांची काढणी केली पण खरेदीदार मिळेनात, कुठे ते वाचा...

धान्य वाटप रजिस्टरमध्ये खाडाखोड
धान्य वाटप रजिस्टरमध्ये खाडाखोड केल्याचेही या वेळी निदर्शनास आले. यामुळे वाटप करण्यात आलेले धान्य व शिल्लक धान्याबाबत कोणताही स्पष्ट बोध होत नसल्याचा शेरा मारत संबंधित दुकानदारांच्या परवाना निलंबित करावा, असा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. तालुक्यातील रेडगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध आलेल्या तक्रारी पाहता या ठिकाणी तपासणी करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती श्री. खेडेकर यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Proposal for suspension of license due to discrepancies during inspection, read where hingoli news