गाव सांभाळा, मी तुमच्यासोबत आहे ; सरपंच, पदाधिकाऱ्यांशी पालकमंत्र्यांनी साधला संवाद

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

चोरून कोणी गावात येत असेल तर त्यांना गावात प्रवेश देऊ नका. तातडीने प्रशासनाला कळवा. गाव सांभाळा. मी चोवीस तास आपल्या मदतीसाठी सजग आहे, अशा शब्दांत पालकमंत्री अमित देशमुख यांनी संवाद साधला.

लातूर  : परराज्यातील आणि परजिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण आपल्या जिल्ह्यात येणार नाही, याची दक्षता घ्या. अपरिहार्य कारणाशिवाय कोणालाही जिल्ह्याची सीमा ओलांडून येता किंवा जाता येणार नाही. इतर शहरांत नातेवाईक अडकले असतील, तर त्यांना थोडे दिवस तेथेच थांबायला सांगा. चोरून कोणी गावात येत असेल तर त्यांना गावात प्रवेश देऊ नका. तातडीने प्रशासनाला कळवा. गाव सांभाळा. मी चोवीस तास आपल्या मदतीसाठी सजग आहे, अशा शब्दांत पालकमंत्री अमित देशमुख यांनी संवाद साधला.

जिल्ह्यातील सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य; तसेच प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी देशमुख यांनी टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे बुधवारी (ता. २२) संवाद साधला. कोरोनाविरोधातील लढा अद्याप संपलेला नाही. आपले गाव, आपला जिल्हा यापुढेही कोरोनामुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी सजग राहावे. संपूर्ण जग या विषाणूविरोधात लढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार लढत आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावरील प्रशासन झटत आहे. त्याच पद्धतीने गावपातळीवर ग्रामपंचायतीनेही हा लढा लढावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

आजवर आपण सर्वांनी प्रामाणिकपणे लढल्यामुळेच आपला संपूर्ण जिल्हा सध्या कोरोनामुक्त आहे. केंद्र सरकारनेही याची दखल घेतली आहे. यापुढेही आपल्याला दिलेल्या सूचनांचे पालन सर्वांनी करावे. जोपर्यंत प्रभावी उपचारपद्धती किंवा लस याचा शोध लागणार नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवावा लागणार आहे. योग्य ती काळजी न घेतल्यास संकट ओढवू शकते, हे कायम लक्षात ठेवा. घरात किंवा गावात सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे असलेली व्यक्ती दिसून आल्यास त्यास ताबडतोब रुग्णालयात जाण्याचा सल्ला द्या, असे देशमुख यांनी सांगितले.

तुटवडा निर्माण होणार नाही
ग्रामीण भागासाठी काही नियम शिथिलही करण्यात आले आहेत. त्यानुसार शेतीची सर्व कामे सुरू करावीत. रोजगार हमी, जलसंधारणाची कामे तातडीने सुरू करायची आहेत. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या हद्दीबाहेरील रस्ते, सिंचन यासंबंधीच्या बांधकामांना परवानगी दिली आहे; मात्र हे करीत असताना संबंधित विभागाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे. ऊन वाढत असल्याने पाणीटंचाई, वीजपुरवठा या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. आगामी काळात खरीप मशागतीची कामे सुरू होतील. त्यामुळे खते, बियाणे यांचा तुटवडा निर्माण होणार नाही, यावरही बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे देशमुख यांनी सांगितले.
-------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protect Villages, I Am With You, Guardian Minister Assured Sarpanch, Others