आंदोलकांनी पसरवलं, पोलिसांनी आवरलं...!

गणेश पांडे
Friday, 5 June 2020

कोरोना योध्दे म्हणून मोठेपणा देवून पोलिसांच्या डोक्यावर संरक्षणासह सर्वच जबाबदाऱ्या टाकल्या जात आहेत. एकीकडे संरक्षणही करायचे व दुसरीकडे मदतीलाही धावून जायचे असे गेल्या दोन महिण्यापासून पोलिस अधिकारी - कर्मचाऱ्यांचे कामे सुरु आहेत. परंतू, या विपरित परिस्थितीत ही पोलिसांना अजून एक काम करताना सर्वांनीच पाहिले.

परभणी ः कोरोना योध्दे म्हणून मोठेपणा देवून पोलिसांच्या डोक्यावर संरक्षणासह सर्वच जबाबदाऱ्या टाकल्या जात आहेत. एकीकडे संरक्षणही करायचे व दुसरीकडे मदतीलाही धावून जायचे असे गेल्या दोन महिण्यापासून पोलिस अधिकारी - कर्मचाऱ्यांचे कामे सुरु आहेत. परंतू, या विपरित परिस्थितीत ही पोलिसांना अजून एक काम करताना सर्वांनीच पाहिले. आंदोलकांनी केलेल्या आंदोलनात फेकलेला कापूस गुरुवारी (ता.चार) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वाऱ्याने पसरला गेला. हा कापुस गोळा करण्याचे कामही पोलिसांनाच करावे लागले.

कोरोना विषाणु संसर्गानंतर देशात व राज्यात पोलिसांचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. रात्रंदिवस पोलिस खात्यातील अधिकारी - कर्मचारी त्यांच्या जीवाची बाजी लावून काम करत आहेत. पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसतानाही पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. कधी कोरोनाचा रुग्ण पळून गेला तर त्याला सापडून आणण्याची जबाबदारी देखील पोलिसांनाच पार पाडावी लागत आहे. केवळ कायदा व सुव्यवस्था तसेच संरक्षणाची जबाबादारी असणाऱ्या पोलिसांना या दोन महिण्यात अनेक कामे करावी लागली. ड्युटी व्यक्तीरिक्त लोकांच्या मनातील भीती दूर करणे, त्यांना बाहेर पडू नका म्हणून विनंती करणे इतकेच काय तर बेघर व ज्यांना आसरा नाही अशांना स्वतःच्या खर्चातून अन्न - पाणी पुरविण्याचे महान कार्य देखील पोलिसांनी निस्वार्थवृत्तीने सुरु केले आहे. 

पोलिसांप्रती आदरभाव वाढला
ऐरवी सरकारी कर्मचाऱ्यांना आठ तासाच्या कर्तव्याचे बंधन असते. परंतू, हा खाकी वर्दीतील माणुस दिवसातील चोवीस तास रस्त्यावरच असतो. अश्या या पोलिस कर्मचाऱ्यांच्या या कोरोना काळातील कामाचा कोणी लेखाजोखा ठेवला असेल की नाही हे गुढच आहे. परंतू, तो मात्र उभा आहे...! खंबीरपणे...! साथ रोगाशी सामना करण्यासाठी. कोरोनाच्या संकट काळात वेगवेगळ्या आघाड्यावर काम करून परभणी पोलिसांनी स्वतःची कार्यक्षमता सिध्द केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिसांप्रती निश्चित आदरभाव वाढला आहे.

हेही वाचा - Video - पर्यावरण संतुलनासाठी संवेदनशील होण्याची गरज, कशी? ते वाचाच 

कापूस फेकला पोर्चमध्ये 
गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्यावतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दरवाज्यासमोरच आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलन करणाऱ्या नेत्यांनी सोबत आणलेला कापूस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोर्चमध्ये फेकून दिला. एक - दीड तास आंदोलनाच्या घोषणा देत आंदोलक जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी निघून गेले. मात्र, सोबत आणलेला कापूस त्याच पोर्चमध्ये पडून होता. गुरुवारी जोराचे वारे असल्याने पोर्चमध्ये पडलेला कापूस वाऱ्याने इतरत्र पसरला जावू लागला.  हा कापूस जमा करण्यासाठी ना नेते समोर आले ना जिल्हाधिकारी कार्यालयातील सेवक. या वेळी नवामोंढा पोलिसांना पुढाकार घेत हा कापुस गोळा करावा लागला.

हेही वाचा - मुंबईहून परतलेल्या रुग्णांनी प्रशासनाची उडवली झोप

राजकीय नेत्यांच्या मनातील पोलिसांप्रतीचा आदरभाव गेला तरी कुठे ?
ज्या कोरोना काळात पोलिसांबद्दल प्रचंड आदरभाव निर्माण झाला आहे. सर्वसामान्य लोकांमध्येही पोलिसांची प्रतिमा उजळळी आहे. या पोलिसांप्रती राजकीय नेत्यांनी देखील आदरभाव व्यक्त केला. परंतू, आंदोलनाच्या घाईगडबडीमध्ये या राजकीय नेत्यांच्या मनातील पोलिसांप्रतीचा आदरभाव कुठे गेला ? असा प्रश्न या वेळी उपस्थित होत होता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protesters Spread, Police Covered ...! parbhani news